समिधा समाजकार्याची...

    दिनांक :13-Oct-2021
|
प्रासंगिक 
 
-  दुर्गेश साठवणे
भारताला प्राचीन काळापासून समाजकार्याची परंपरा लाभली आहे. दैवी संकल्पनेतदेखील पाप-पुण्याचे परिमार्जन समाजकार्याद्वारा केले जाते. बदलत्या काळानुसार समाजकार्याच्या स्वरूपात व पद्धतीत बदल झाला असला, तरी उद्देश मात्र तोच आहे. समाजातील दीन-दलित व्यक्तींची मदत करणे हा प्रामाणिक उद्देश ठेवून प्रत्येक समाज कार्यकर्ता कार्य करतो. भारतीय संस्कृतीत दान संकल्पनेला महत्त्व आहे. प्रारंभिक समाजकार्याचे स्वरूप दानाच्या स्वरूपात होते. पण, हळूहळू सामाजिक आवश्यकतेनुसार समाजकार्याचे स्वरूप बदलत गेले. 19 व्या शतकात भारतात मोठ्या प्रमाणात समाजकार्याचा विकास झाला. भारतीय सुधारकांनी संस्थांच्या माध्यमातून समाजकार्याची सुरुवात केली. राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून सती प्रथेसारख्या अनिष्ट रूढीचा विरोध करीत समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला तर आर्य समाजाच्या माध्यमातून स्वामी दयानंद सरस्वती यांनी बालविवाह, जातिभेद यासार‘या समाजाला खंडित करणार्‍या रूढींचा विरोध केला.
 
blogs _1  H x W
 
अशा प्रकारच्या अनेक संस्था व व्यक्ती 19 व्या शतकात समाजकार्याचा पायंडा घालत होत्या. यातूनच विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणासार‘या महत्त्वपूर्ण विषयांवर जागृती होऊन समाजमन या गोष्टींना मान्यता देऊ लागले. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मोठ्या प्रमाणात दारिद्राची भीषण समस्या भारतासमोर आ वासून उभी राहिली. यातून भूकबळी, कुपोषण अशा भीषण समस्यांनी भारतासमोर अनेक प्रश्न निर्माण केले. इंग्रज भारतात आल्यानंतर ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या कार्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. देशातील दुर्बल घटकांना मदत करीत असताना मिशनर्‍यांचा छुपा अजेंडादेखील पूर्ण होत होता; तो म्हणजे धर्मांतरण! परंतु मिशनर्‍यांप्रमाणेच भारतीय मानवतावादी विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक संस्था व संघटनांचा जन्म या काळात झाला. समाजातील सर्व वंचित घटकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात व त्यांनी समाजातील बाकी लोकांसारखे जीवन जगावे, हा उदात्त हेतू ठेवून काही व्यक्ती आणि संस्था समर्पित वृत्तीने कार्य करीत होत्या. यातूनच अनाथालय, वृद्धाश्रम, मतिमंद निवासीशाळा, धर्मशाळा यासार‘या संस्था कार्य करू लागल्या. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून अनेक समाज कार्यकर्ता विभूतींनी लोकसेवेच्या यज्ञकुंडात आपली समिधा अर्पण केली.
 
 
भारतीय समाजकार्यात नानाजी देशमुख यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चित्रकूट प्रकल्पाच्या माध्यमातून व दीनदयाल शोध संस्थानद्वारा भारतीय समाजाला आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा दृष्टिकोन भारतीय समाजकार्याला नवचेतना देणारा होता; त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत असंख्य सामाजिक कार्यकर्ते देशाच्या अनेक भागात गेले व त्यातून लोकांना आत्मनिर्भर बनविण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सदोदित चालू आहे. त्यातील एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे स्व. सुनील देशपांडे. सुनीलजींनी भारताच्या सर्वात कुपोषणग‘स्त मेळघाटसारख्या भागात जंगलातील साधनसंपत्तीच्या आधारावर उभारलेला संपूर्ण बांबू प्रकल्प जनजाती समाजाच्या विकासाचा माध्यम ठरला.
 
 
ज्या काळात कुष्ठरोग्यांना समाजात अतिहीन वागणूक दिली जात होती, अशावेळी बाबा आमटे यांच्याद्वारे उभारण्यात आलेले वरोरा येथील आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांना मिळालेला मायेचा आधार होय. वडिलांचा पायंडा पुढे चालवत दुर्गम भामरागडच्या जंगलात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. प्रकाश आमटेंनी उभारलेला ‘लोकबिरादरी प्रकल्प’ जनजाती समाजाला मिळालेली नवसंजीवनीच म्हणावी लागेल. पोटाची खळगी भरण्यासाठी रानोवन भटकणार्‍या भटक्यांच्या वेदना दूर करण्यासाठी गिरीश प्रभुणे यांनी यमगरवाडी प्रकल्प चालू केला. एवढेच नाही, तर भटक्यांच्या विकासासाठी आजही ते चंदनासारखे झिजत आहेत. सुखी आयुष्याचा त्याग करीत मेळघाटच्या जंगलात आयुष्याची काडे करीत डॉ. स्मिता कोल्हे व रवींद्र कोल्हेंचे कार्य मानवतेचा अखंड झराच म्हणावा लागेल.
 
 
आयुष्यातील संकटांवर मात करीत हजारो अनाथांची माय सिंधुताई आजही सिंधूच्या अखंडित प्रवाहाप्रमाणे समाजकार्याची अखंडित धारा घेऊन वाहत आहे. अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते देखील लोककल्याणाच्या पताका घेऊन समाजकार्य करीत आहेत. वनवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्य करणार्‍या वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य जनजाती भागात विकासाचे द्योतक आहे. कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. यातून लक्षात येते की, सध्याच्या विकासाच्या बदलत्या काळातदेखील समाजकार्यात वाढ झाली आहे. भारतात समाजकार्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असून प्रशिक्षित समाजकार्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची भावना वृद्धिंगत होताना दिसत आहे. अनेक समाजकार्य महाविद्यालयांची निर्मिती भारतात झाली आहे. त्यातून अनेक विद्यार्थी समाजकार्याचे व्यावहारिक शिक्षण घेत आहेत. यातून समाजहिताच्या भावनेने प्रेरित पिढी निर्माण होत आहे. अलीकडे समाजकार्याचे व्यापक स्वरूप निर्माण झाले आहे.
 
 
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःखभाग् भवेत॥
 
 या संकल्पनेचा आधार घेत हजारो समाज कार्यकर्ते आज विविध क्षेत्रात कार्य करीत आहेत.
- संशोधक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी
विश्वविद्यालय, वर्धा
 
 
- 8208068853