ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष, जागर गरजेचा

- आ. चंद्रकांत पाटील यांनी वेधले लक्ष

    दिनांक :13-Oct-2021
|
नागपूर,  
महाविकास आघाडी सरकारला मराठा किंवा ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे राजकीय आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष आणि गावागावात जाऊन जागर करावा लागेल, याकडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी बांधवांचे लक्ष वेधले.
 
 
obc jaagar_1  H
 
 
 
भाजपा ओबीसी मोर्चाची जागर यात्रा पंढरपूरहून निघाली आहे. त्या अंतर्गत आज कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भ विभागीय ओबीसी जागर मेळावा आयोजित करण्यात आला होता. खा. विकास महात्मे, खा. रामदास तडस, खा. सुनील मेंढे, खा. अशोक नेते, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महानगर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर, आ. डॉ. परिणय फुके, प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, उपाध्यक्ष संजय गाते, हेमंत पटले, माजी ओबीसी मंत्री आ. डॉ. संजय कुटे, आ. टेकचंद सावरकर, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी आ. अशोक मानकर, डॉ. मिलींद माने आदींसह विदर्भातील भाजपचे आमदार व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
 
अतिशय शांत पण प्रभावशाली भाषणात आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, इम्पिरिकल डाटा त्यातही नागपूर शहराचा तीन दिवसात काढू शकतो, इतका सोपा मार्ग. पण, कायदा करणे सोडाच, भाजपने काढलेला अध्यादेशही या महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. ओबीसी आरक्षणाशिवाय या सरकारने 6 जि.प. निवडणुका धडकवल्या. कारण, त्यांना आरक्षण द्यायचे नाही. आगामी निवडणुका आरक्षणाशिवाय झाल्या तर पुन्हा 5 वर्षे काहीच करता येणार नाही.
 
 
 
ओबीसी आरक्षण आवश्यक आहे. त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. चळवळ उभारावी लागेल. या सरकारला शासन चालवता येत नाहीय्. पुन्हा सत्तेत येण्याची शाश्वती नसल्याने केवळ नोटा छापण्याचा उद्योग सुरू आहे. या सरकारचे नाक दाबल्याशिवाय ते तोंड उघडणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
 
 
 
हंसराज अहिर, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, प्रवीण दटके, योगेश टिळेकर आदींनी ओबीसी आरक्षण व पूर्वपिठिका सांगून गावागावात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध जागर करण्याचे आवाहन केले. आ. पाटील व इतर पदाधिकार्‍यांचे प्रवेशद्वारावर ढोल-ताशाच्या गजरात तसेच व्यासपीठावर भला मोठा हार घालून स्वागत करण्यात आले. संजय बंगाले, अविनाश ठाकरे, भोलानाथ सहारे, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण आदींच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्तम व चोख व्यवस्था ठेवली होती.