फुलसावंगीचे पुरातन महाकाली देवस्थान

    दिनांक :13-Oct-2021
|
विजय पाटील 
फुलसावंगी,  
येथे महाकालीचे पुरातन मंदिर असून श्रीक्षेत्र माहूरगडाच्या दक्षिणेस असलेले हे शक्तीपीठ भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रीमध्ये परिसरातील भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते. ‘माहूरगडाचे दक्षिणद्वार’ असा उल्लेख असलेले हेमाडपंथी महादेवाचे पुण्येश्वर देवस्थान येथे आहे.
 
 
mahakali _1  H
 
 
 
तसेच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या रेणुका देवीच्या दक्षिणेस महाकाली देवीचे पुरातन मंदिर आहे. यालासुद्धा माहूरगडाचे दक्षिण द्वार मानल्या जाते. हे मंदिर अतिशय पुरातन काळातील आहे. या देवीच्या मुखवट्याची निर्मिती बेल, राळ आणि शेंदूर याचा उपयोग करून करण्यात आली असल्याचे येथील वयोवृद्ध नागरिक सांगतात. 7 फूट उंच आणि 6 फूट रुंद असा महाकाय मुखवटा या देवीचा आहे. जवळपास दोन शतकांपूर्वी या मंदिराची उभारणी झाली आहे. तेव्हापासून ही महाकाली देवी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा मुखवटा या देवीचा असल्याचे सांगितले जाते.
 
 
 
ही महाकाली नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे येथे पूर्वेस असलेले हेमाडपंथी पुण्येश्वर मंदिर पश्चिममुखी आहे आणि गावाच्या पश्चिमेस महाकाली देवीचे मंदिर आहे. या देवीच्या मंदिराची दुर्गादेवी म्हणून परिसरात ‘याती आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
 
 
 
नवरात्र उत्सवात पंचक्रोशीतील भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते. तर नवमीच्या दिवशी येथे मोठा होम केला जातो. दसर्‍याच्या दिवशी देवीची पालखी वाजतगाजत सोने लुटण्यासाठी जाते. सोने आणण्यासाठी सर्व गावकरी देवीच्या पालखीसोबत जातात. सर्वप्रथम देवीला दसर्‍याचे सोने चढविल्यानंतर सर्व गावकरी आपापल्या इष्टमित्रांना ते सोने देऊन शुभेच्छा देतात. मागील पाच वर्षांपासून गावातील भाविकांकडून मंदिराच्या नवनिर्माणाचे कार्य चालू आहे. या देवीमंदिर बांधकामासाठी शासनाकडून कोणताही निधी प्राप्त झाला नसून भाविकांच्याच देणगीतून मंदिराचे नवनिर्माण सुरू आहे.