प्रथमच सूर्यमालेच्या बाहेर जाणार यान

‘नासा’घडवणार नवा इतिहास

    दिनांक :13-Oct-2021
|
वॉशिंग्टन,
अमेरिकी अंतराळ संस्था नासा आता लघुग्रहांच्या अभ्यासासाठी याच आठवड्यात एक नवी मोहीम सुरू करणार असून त्यासाठी प्रथमच एखादे यान सूर्यमालेच्या बाहेर उड्डाण करणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर नासाच्या नावे अंतराळ विज्ञानात नव्या ऐतिहासिक घटनेची नोंद होणार आहे.
 
intre _1  H x W
 
नासाच्या या नव्या मिशनचे नाव लूसी एस्टेरॉईड स्पेसक्रफ्ट असे असून, लूसी अंतराळात जाऊन लघुग्रहांचा अभ्यास करणार आहे. याद्वारे सूर्यमालेच्या निर्मितीमागील रहस्यांचा काही प्रमाणात उलगडा होण्यास मदत होणार आहे. या मिशनचा एकूण खर्च 7387 कोटी रुपये राहणार आहे. लूसी स्पेसक्रफ्टला अंतराळात पाठविण्याच्या पहिल्या टप्प्याला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून त्यानंतर तीन दिवसांनी हे यान कोणत्याही क्षणी अंतराळाच्या दिशेने उड्डाण करेल. ही मोहीम बारा वर्षांसाठी आहे. लूसी यानाला सौरमालेच्या बाहेर जाण्यासाठी बारा वर्षांचा काळ लागणार आहे. यादरम्यान किमान अर्धा डझनाहून अधिक लघुग्रह त्याच्या आजुबाजूने जातील, असा अंदाज आहे.
 
 
या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, प्रथमच एखादे यान सूर्यमालेच्या बाहेर जाणार आहे. पहिल्यांदाच सूर्यमाला आणि अंतराळाच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासासाठी एखादे यान पाठविले जात आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे या मोहिमेकडे लक्ष लागून राहिले आहे.