घरगुती गॅसची किंमत 2657 रुपये प्रति सिलेंडर

    दिनांक :13-Oct-2021
|
कोलंबो, 
मागील दिड वर्षांपासून उभ्या ठाकलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील नागरिकांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. अशातच आता सण-उत्सव जवळ आले असताना सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसणार असल्याचे दिसत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, LPG Gas दरवाढीने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. परंतु ही परिस्थिती केवळ मात्र भारताचीच नाही तर इतरही देशात हीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे.
 
cylinder _1  H
 
 
 
आपले शेजारी राष्ट्र श्रीलंका येथे प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली असून येथे घरगूती सिलेंडरची किंमत भारताच्या तुलनेत तिप्पट झाली आहे. सध्या श्रीलंकेच्या पूर्वीच्या किंमतीपेक्षा दुप्पट झाली आहे. श्रीलंकेत गॅस सिलिंडरची किंमत 2657 रुपये झाली आहे. श्रीलंकेत सरकारने नुकतीच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवरील मर्यादा संपवली होती. त्यानंतर एलपीजीच्या किंमतीत सुमारे 90 टक्क्याने वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
 
 
श्रीलंकेत प्रचंड प्रमाणात महागाईने डोके वर काढले आहे. श्रीलंकेत एक लिटर दुध तब्बल 250 रूपयांना मिळत आहे. यासोबत इतरही अन्नधान्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. या देशात 12.5 किलो सिलिंडरची किंमत 1400 रुपये होती. पण त्या किमतीत 1257 रूपयाची वाढ झाली असून आता येथे सिलिंडर 2657 रूपयांना विकला जात आहे. भारतात सध्या 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांच्या आसपास आहे.
 
 
श्रीलंकेतील सामान्य नागरिक महागाईमुळे हैरान झाले असून त्यांनी सोशल मीडियावरून याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजापक्षे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत श्रीलंका सरकारने एलपीजी गॅस, दुध, साखर, गव्हाचे पीठ, सिमेंटचे किंमत मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेतील जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढली आहे.