मलकानगिरीत तीन माओवाद्यांचा खात्मा

तिघांवर होते 10 लाखांचे बक्षीस

    दिनांक :13-Oct-2021
|
मलकानगिरी,
ओडिशातील मलगानगिरी जिल्ह्यात तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, ते अतिवांछित माओवाद्यांच्या यादीत होते. या तीनही माओवाद्यांच्या शिरावर एकत्रितपणे 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते, अशी माहिती ओडिशाचे पोलिस महासंचालक अभय यांनी आज बुधवारी दिली.
 
natre _1  H x W
 
तुलासी वनक्षेत्र परिसरात मंगळवारी झालेल्या चकमकीत तीन माओवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर ओडिशाचे पोलिस महासंचालक आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी आज जिल्हा पोलिस मुख्यालयाला भेट देऊन नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. विशेष कारवाई पथक, मलकानगिरीतील जिल्हा स्वयंसेवी दल आणि सीमा सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाई दोन पुरुष आणि एका महिला माओवाद्याला ठार करण्यात आले, असे अभय यांनी सांगितले. चकमकीत ठार झालेल्यांमध्ये परिसर समितीचा सचिव मुका सोदी उर्फ अनिल उर्फ किशोर, चिन्ना राव आणि सोनी या महिला माओवाद्याचा समावेश आहे. किशोरवर पाच लाख रुपयांचे, सोनीवर चार लाख रुपये, तर चिन्नावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते.
 
 
मोठा शस्त्रसाठा जप्त
घटनास्थळावरून एसएलआर रायफल, तीन मॅग्झिन्स, इन्सास रायफल व मॅग्झिन, एके-47 रायफल, एसएलआरची 59 आणि इन्सासची 21 काडतुसे, वॉकी-टॉकी सेट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, डिटोनेटर्स, आयईडी, आयईडीचे रिमोट कंट्रोल, औषधे आणि माओवादी साहित्य जप्त करण्यात आले, अशी माहिती दक्षिण-पश्चिम क्षेत्राचे पोलिस महासंचालक राजेश पंडित यांनी दिली.