तीन हत्याकांडांनी हादरला यवतमाळ जिल्हा

- यवतमाळात दोन, तर पुसदमध्ये एक खून
- जुन्या वादातून घडले हत्याकांड : सहा आरोपी अटकेत

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ / पुसद, 
मंगळवार, 12 ऑक्टोबर रोजी रात्री 10 च्या सुमारास आर्णी मार्गावरील पल्लवी लॉन समोर घडलेल्या दोन खुनांमुळे नवरात्रीच्या भक्तीरसात न्हाऊन निघालेले यवतमाळ पुन्हा एकदा हादरले. उमेश तुळशीराम येरमे (वय 34) व वसीम दिलावर पठाण (वय 35, नेताजीनगर, यवतमाळ) अशी मृतकांची नावे आहेत.
 
 
pusad murder_1  
 
 
 
घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अपर अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनीही घटनास्थळाची पहाणी केली.
 
 
 
तत्काळ कारवाई करून पोलिसांनी अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार (वय 30, नेताजीनगर), नितीन पवार (वय 30, वडगाव), अभिनव शेंडे (वय 30, वडगाव), नीलेश उईके (वय 30, वडगाव), छोटू अन्वरखाँ पठाण (वय 55) व नीरज वाघमारे (वय 32, नेताजीनगर, यवतमाळ) यांना ताब्यात घेतले. या संदर्भात निखत वसीम पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि 302, 109, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहूल शेजव करीत आहेत.
 
 
पुसदमध्ये जन्मदात्या बापाचा मुलांनी केला खून
खंडाळा पोलिस ठाणे हद्दीतील एका धक्कादायक घटनेत पुत्राने दारूच्या नशेत सोयाबीन विक्रीच्या किरकोळ वादावरून जन्मदात्या बापाच्या डोक्यावर वखराची लोखंडी पास मारून निर्घृण खून केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
 
pusad _1  H x W
 
 
अमृतनगर येथे रहिवासी अनिल मारोती गादेकर हा शेतातील सोयाबीन विक्री करून मंगळवार, 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घरी आला. त्यावेळी अनिलचा बाप मारोती तुकाराम गादेकर यांनी अनिलला लोकांचे उधार घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत, तू आगाऊ खर्च करू नको, असे म्हणून सोयाबीन विक्रीची रक्कम मागितली. यावेळी आरोपी दारूच्या नशेत असल्यामुळे त्याने बापाच्या डोक्यावर वखराची लोखंडी पास हाणून जीवच घेतला. आरोपी अनिल गादेकर घरातील मंडळी व गावातील नागरिकांना पोलिसांना जर माहिती द्याल तर तुमचाही असाच मुडदा पाडीन अशा शब्दांत धमकी देत घटनास्थळावरून पसार झाला होता.
 
 
 
घटनेची माहिती नागरिकांनी खंडाळा पोलिसांना कळविली असता पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून वसंतनगर पोलिसांची मदत घेऊन तत्काळ तपासाची सूत्रे हलविली. त्यामुळे पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला सावरगाव बंगला परिसरातील जंगलातून तत्काळ अटक करण्यात आली. आरोपीने केलेल्या कृत्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेतील मारोती गादेकर यांचा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्यावर खंडाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास खंडाळा पोलिस ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.