मालखेड येथे 514 घटांची अखंड ज्योत

- अंबादेवीचे नवरात्र उत्साहात

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा 
चांदूर रेल्वे,  
चांदूर रेल्वे तालुक्सातील मालखेड येथे अंबा देवीच्या नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरूवात झाली असून नवरात्रीच्या अखंड ज्योत सप्ताहात तब्बल 514 घटांची स्थापना करण्यात आली आहे.
 
 
maalkhed_1  H x
 
 
भानामती नदीच्या काठावर वसलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड गावात निसर्गरम्य वातावरणात असलेल्या अंबा मातेच्या आणि शिव मंदिरात भक्तांची नेहमीच गर्दी असते. अंबा माता मालखेडवासीयांचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाते. या मंदिराचा इतिहास जाणून घेतांना अशी माहिती मिळते की, जुन्या काळातील विदर्भ प्रदेशाचा राजा वृषभदेव यांना 10 मूल होती. या 10 मुलाला राजधानीच्या सभोवताली निवासस्थाने वाटून देताना त्या मुलांच्या नावावरून ते त्यांची निवासस्थान ओळखले जात होते.
 
 
 
त्यापैकीच एक केतुमाल नावाचा मुलगा होता, त्याच्याच निवासस्थानी शेजारी जी वस्ती वसल्या गेली. तिला मालकेतू म्हणून ओळखल्या जाऊ लागली या मालकेतू नावाचा अपभ्रंश होऊन पुढे मालखेड नाव प्रचलित झाले याच मालकेतू ग्रामचा उल्लेख श्रीमद भागवत आणि देवी भागवत यात आढळतो. याच केतुमाल राजाने मालकेतू या वस्ती शेजारी असणार्‍या दक्षिण वाहिनी भानामती नदीच्या काठी अंबा मातेची आराधना केली. त्याची आराधना आणि भक्ती भाव पाहून अंबा माता प्रसन्न होऊन साक्षात प्रकटली व मालकेतूला इच्छित वर मागण्या करिता सांगितले त्याने धन वैभव न मागता येथेच भक्तांच्या मनोकामना तथा त्यांच्या कल्याणासाठी येथेच विराजमान होण्याची विनंती केली. देवीने ते मान्य करून तेथेच विराजमान झाली म्हणून येथील मातेची मूर्ती ही स्वयंभू व मनोकामना पूर्ण करणारी आहे असे सांगण्यात येते.
 
 
 
मंदिराला लागून असलेली भानामती नदी ही दक्षिणवाहिनी नदी असून या नदीच्या तीरावर केलेली पूजा विधी ही लवकरच सफल होते असा समज प्रचलित आहे. येथे नवरात्रीच्या दरम्यान नऊ दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी 514 घटांची स्थापना केल्या गेली असून दरवर्षी हा आकडा वाढत जात आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी होणार्‍या महाआरतीला शेकडो भक्त गणांची हजेरी सुद्धा असते. गावातील पुजारी संजयपंत जोशी महाराज व गावातील तरुण मंडळी सर्व व्यवस्थापन करतात. येत्या 17 ऑक्टोबरला भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
मंदिराचे महंत शिवानंद पुरी महाराज 
गेल्या 26 वर्षांपासून तपस्वी शिवानंद पुरी महाराज हे सेवेत कार्यरत आहेत. तसेच ते श्री पंचदशनाम जुना आखाडा सचिवपदी आहे. ते आलेत तेव्हापासून मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला असे मत गावकरी व्यक्त करतात. शिवाय अंबा देवी संस्थानचे विश्वस्त अशोकराव देशमुख हे देखील मंदिराच्या सौंदर्यीकरणा करिता परिश्रम घेत आहेत. मुंबई - नागपुर रेल्वे लाईन मंदिराच्या बाजुने गेली असून रेल्वे गाडीतून मंदिराचे दर्शन होते.
 
 
 
पंचमहाभूते अनुकूल स्थान
मालखेड येथील देवीचे मंदिर ज्या स्थानी आहे ते स्थान पंचमहाभूते अनुकूल असलेले आहे. पूर्व दारा समोर मोठे चिंचेचे झाड आहे. त्यापुढे मोकळे गायरान, भानामति नदीचे छोटेसे पात्र, शेतांच्या बाजूने जाणारी पायवाट. सर्वच नयनरम्य आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे द्वार ठेंगणे आहे. दारातून आईचे दर्शन होते.
- प्रिती सचिन हिवराळे (भाविक, अमरावती)