लालूंचा ‘लाल' का झाला लाल?

    दिनांक :14-Oct-2021
|
दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आपण उगीच तुरुंगाच्या बाहेर आलो, असे आता वाटत असेल. चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दीर्घकाळ तुरुंगात होते. तुरुंगात असल्यामुळे सक्रिय राजकारणाशी असलेला त्यांचा संबंध कमी झाला होता. तुरुंगाच्या बाहेर आल्यानंतर आता तरी आपले ‘अच्छे दिन' सुरू होतील, असे त्यांना वाटत होते; पण प्रत्यक्षात त्यांना आपल्या घरातच दोन मुलांच्या भाऊबंदकीचा तसेच यादवीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तुरुंगातून सुटल्यानंतरही लालूप्रसादांची पाटण्याला जाण्याची हिंमत झाली नाही. गेल्या काही महिन्यांपासून ते राजधानी दिल्लीतच मुक्कामाला आहेत.
  

wp _1  H x W: 0 
 
 
लालूप्रसाद यादव यांना चार-पाच जणांनी दिल्लीत बंधक बनवून ठेवले आहे. त्यांना राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचे आहे, असा सनसनाटी आरोप करून तेजप्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली. तेजप्रताप यांनी नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख तेजस्वी यादव यांच्याकडे आहे, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच लालूप्रसादांना कोणी बंधक बनवू शकत नाही, असे प्रत्युत्तर तेजस्वी यादव यांनी दिले. यात भर घातली राजदचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी! तेजप्रताप आता राजदमध्ये नाहीत, असे विधान त्यांनी करीत वातावरण आणखी तापवले. तेजप्रताप यादव यांनी वेगळा पक्ष काढला आहे. त्यामुळे ते आता पक्षात नाही; ते स्वत:हूनच पक्षातून बाहेर झाले, असे तिवारी म्हणाले. दुसरीकडे मला पक्षातून बाहेर काढण्याची कोणाची हिंमत नाही, असे आव्हान तेजप्रताप यांनी दिले आहे.
 
कधीकाळी स्वत:ला कृष्ण आणि तेजस्वीला अर्जुन मानणा-या तेजप्रताप यांनी आता आपला छोटा भाऊ असलेल्या अर्जुनाविरुद्ध लढाई पुकारली आहे. आधुनिक महाभारतातील या कृष्णाने अर्जुनाला गीता सांगण्याऐवजी त्याच्यावर आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेची तलवार उगारत सर्वांना धक्का दिला आहे. कधीकाळी तेजस्वी यादवच्या डोक्यावर मुकुट घालणा-या तेजप्रताप यादव यांनी कोणी कितीही षडयंत्र रचले, तरी कृष्ण-अर्जुनाची ही जोडी कोणी फोडू शकणार नाही, असे म्हटले होते. पण, आता त्याच तेजप्रतापांनी कृष्ण-अर्जुनाच्या जोडीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.
 
लालूप्रसादांच्या तेजस्वी यादव तसेच तेजप्रताप यादव या दोन मुलांतील वाद म्हणजे सत्तासंघर्ष तसा जुना आहे. यावेळी हा वाद नव्याने उफाळून आला, तो बिहार विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजदने जारी केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीने. या यादीत आपले नाव नसल्यामुळे तेजप्रताप भडकले. पण तसे स्पष्टपणे न म्हणता, माझे नाव नसले तरी हरकत नाही; मात्र या यादीत राबडीदेवी आणि मिसाकुमारी यांचे नाव हवे होते. या दोघींचे यादीत नाव नसणे, हा बिहारच्या महिलांचा अपमान आहे, असे वळण देण्याचा प्रयत्न तेजप्रताप यादव यांनी केला. आपल्या आयुष्यात बहुधा प्रथमच तेजप्रताप एवढे तर्कशुद्ध आणि शहाण्यासारखे बोलले असावेत. या यादीत आपले नाव नसण्यावर मात्र राबडीदेवी आणि मिसाकुमारी यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. लालूप्रसादांनी आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून आपल्या लहान मुलाची तेजस्वी यादव याची निवड केली आणि या वादाला तोंड फुटले.
 
तेजस्वी यादवला लालूप्रसादांनी आपला राजकीय उत्तराधिकारी बनवणे, हे मोठा मुलगा असलेल्या तेजप्रताप यादवला पटलेले नाही. तेजप्रताप यादवांचे प्रताप पाहता तेजस्वी यादवकडे राजदची सूत्रे सोपविण्याचा लालूप्रसादांचा निर्णय योग्य म्हणावा लागेल. तेजस्वी यादवनेही आपल्या कर्तृत्वाने आपल्या वडिलांची निवड योग्य ठरवली. या घटनेपासून दोघेही सुरुवातीला दाखवत नसले, तरी तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला. छात्र युवा जनता दलाच्या प्रदेश अध्यक्षपदी तेजप्रताप यादव यांनी पक्षाच्या नेतृत्वाला न विचारता परस्पर आकाश यादव यांची नियुक्ती केली. काही दिवसांतच राजदचे प्रदेश अध्यक्ष जगदानंदसिंह यांनी आकाश यांची हकालपट्टी केली, तेव्हापासून ख-या अर्थाने राजदमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला. जगदानंदसिंह यांनी हा निर्णय लालूप्रसाद यादव तसेच तेजस्वी यादव यांना विचारूनच घेतला होता. मात्र, तेव्हापासून तेजप्रताप यांचा थयथयाट सुरू झाला. तेजप्रतापने आपली वेगळी चूल मांडत छात्र जनशक्ती परिषदेची स्थापना केली.
 
बिहारच्या तारापूर विधानसभा मतदारसंघात होणा-या पोटनिवडणुकीत तेजप्रताप यादवने राजद उमेदवाराच्या विरोधात संजयकुमार नावाच्या अपक्ष उमेदवाराला उतरवले. मात्र, तेजस्वी यादव यांनी संजयकुमारला माघार घ्यायला लावली. राजदला शह देण्याची तेजप्रताप यादव यांची प्रत्येक चाल तेजस्वी यादव यांनी हाणून पाडली. त्यामुळे तेजप्रताप यादवचा तीळपापड झाला. संतापलेल्या तेजप्रताप यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनी राजधानी पाटण्यात जनशक्ती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला तसेच अनवाणी पायांनी तशी यात्रा काढलीही. मुळात जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनी तेजप्रताप यादव यांनी अशी यात्रा काढणे, हाच एक मोठा विनोद आहे. कारण, जयप्रकाश नारायण मूल्यांवर विश्वास ठेवणारे लोकनायक होते तर राजद आणि तेजप्रताप यांच्या एकूणच राजकारणाशी मूल्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही.
 
तेजप्रतापला या यात्रेपासून परावृत्त करण्यासाठी लालूप्रसादांच्या सूचनेवरून राबडीदेवी यांनी दिल्लीहून पाटण्याला धाव घेतली. विमानतळावरूनच त्या तेजप्रताप यादवच्या सरकारी निवासस्थानी पोहोचल्या; पण त्याआधीच तेजप्रताप जनशक्ती यात्रेत सहभागी होण्यासाठी बाहेर निघून गेले होते. तेजप्रताप यादव यांनी नुकतीच बिहार प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अशोक राम यांची भेट घेतली. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी राजदला राम राम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात तेजप्रताप यादव यांनी राजद सोडली तरी राजदचे फारसे नुकसान होण्याची तसेच ते ज्या पक्षात प्रवेश करतील, त्याचा यत्किंचितही फायदा होण्याची शक्यता नाही. कारण, तेजप्रताप यादव सुरुवातीपासूनच आपल्या वागणुकीने वादग्रस्त ठरले. स्वत:ला त्यांनी हास्यास्पद ठरवले. राजकीय नेता म्हणून जी समज, संयम आणि विचार करण्याची क्षमता पाहिजे, त्याचा तेजप्रताप यादवमध्ये पूर्ण अभाव आहे. लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र ही एकमेव पात्रता सोडली तर दुसरे कोणतेही गुण त्यांच्यामध्ये नाही.
 
तेजप्रताप विक्षिप्त असल्याची बिहारमधील अनेकांची खात्री पटली आहे. तेजप्रताप यांनीच तशी खात्री पटवून दिली आहे. आपल्या वागणुकीने तेजप्रताप राजदचे किती नुकसान करतील, हे सांगता येत नसले, तरी ते स्वत:चे मात्र भरपूर नुकसान करून घेत आहे. राजदचा फायदा करण्याची क्षमता तेजप्रताप यादव यांच्यात नसली, तरी राजदला नुकसान मात्र ते नक्की पोहोचवू शकतात. कारण कोणाचेही नुकसान करण्यासाठी फारशी अक्कल आणि अनुभवाची गरज नसते. त्या अर्थाने तेजप्रताप यादव राजदसाठी डोकेदुखी ठरत आहेत. तेजप्रताप यादवमुळे राजदची अवस्था गिळताही येत नाही आणि थुंकताही येत नाही, अशी झाली आहे.
तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवूनच आपण दम घेऊ, असे कधीकाळी म्हणणा-या तेजप्रताप यांची आताची भूमिका तेजस्वी यादव मुख्यमंत्री कसे बनतात, ते मी पाहतो, अशी झाली आहे.
 
तेजप्रताप यादव यांचा खरा राग प्रदेश अध्यक्ष जगदानंदसिंह  तसेच तेजस्वी यादव यांचे सल्लागार संजय यादव यांच्यावर आहे. जगदानंदसिंह हिटलर तसेच हुकूमशहा आहे, असा तेजप्रताप यादव यांचा आरोप आहे. जगदानंदसिंह हे शिशुपाल तर संजय यादव यांना दुर्योधन म्हणणा-या तेजप्रताप यादव यांना काय हवे, हे कोणीच आणि ते स्वत:ही सांगू शकत नाही. जगदानंदसिंह तसेच संजय यादव यांना हटवल्यानंतरही (ज्याची कोणतीच शक्यता नाही) तेजप्रताप यादव शांत होतील, याची खात्री कोणी देऊ शकत नाही. एकंदरीत तेजप्रताप यादव यांनी अनेक आजाराने ग्रासलेल्या लालूप्रसादांची झोप उडवली आहे. त्यामुळे लालूप्रसाद आपल्या घरातील भाऊबंदकीवर तसेच यादवीवर कसा तोडगा काढतात, याबाबत उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
 
९८८१७१७८१७