एका प्रस्थानाची तयारी...!

    दिनांक :14-Oct-2021
|
ऊन-सावली 
- गिरीश प्रभुणे
‘‘अरे आता पुरे झालं. किती वेळा कंगवा फिरवशील. एकदम सर्व केस वळणार नाहीत. एका दिवसात तर नाहीच आणि काही चुकार केस तसेच राहणार... आता निघ बघू... चल...'' कुठंही निघायच्या आधी मला तयारीला खूप वेळ लागतो. प्रत्येक वस्तू शोधून घ्यावी लागे. ती ठेवताना जरी व्यवस्थित ठेवली तरी सापडत नसे. कारण, ठेवलेली जागा तीच असे. जिथे ती वस्तू हवी असे. मीच भलतीकडे शोधत बसे. असं नेहमीच होत असे. लहान असताना आई शोधून देई. पुढे बहिणी शोधून देत. नंतर पत्नी संध्या शोधून देऊ लागली. पुढे मनस्विनी करू लागली. आता इथल्या शिक्षिका... मुली वस्तू शोधून देतात... तरीही माझी तयारी पूर्ण होत नसे... प्रवासाला बाहेर पडल्याशिवाय. काय राहिलं हे समजतच नाही. मग मागे वळून वळून येऊन ती वस्तू, ते पुस्तक घेत असे. तरीही काही राहतच असे... उगाचंच हुरहूर लागत राही...!
 

us _1  H x W: 0 
 
यासाठी ‘प्रस्थान' ठेवावं... तिथी निश्चित करावी. वेळ निश्चित करावी. आणि अखेर जे आहे त्याच्यासह चालायला सुरुवात करावी. जे राहील ते राहील... जे मिळालं... सापडलं... गवसलं... हाती आलं, त्याच्यानिशी प्रवासाला निघावं...आई प्रत्येक प्रवासाच्या वेळी.. परीक्षेच्या वेळी हातावर दहीसाखर ठेवी... तिच्या मुखातून शब्द बाहेर येत नसत.... प्रत्येक गोष्ट मनापासून, मन लावून अगदी व्यवस्थित करण्याची तिची सवय... तिचं सर्वच वेळेवर, वेळेत होत असे. सर्व जिथल्या तिथं ठेवण्याच्या सवयीमुळे तिची वेळ कधीच चुकत नसे. तसा मी मुळातच अव्यवस्थित. त्यात आई- संघ यामुळे जो काही थोडासा व्यवस्थितपणा आला, त्यानं अनेक दोष झाकले गेले. समाजात वावरताना समाजाची घडीसुद्धा आश्चर्यकारक अत्यंत व्यवस्थित बसलेली! घटिका पळे- दिवस- पक्ष- मास- अयन- वर्ष- युग या सा-यांशी मिळतीजुळती जीवनशैली पशुपक्षी अगदी मुंगीपासून ते गरुडापर्यंत. रोहित-सारस पक्ष्यांपर्यंत सर्वांची जीवनशैली या तिथीवार नक्षत्रांप्रमाणेच...! थोडीशीसुद्धा चूक नाही. विसंगती नाही. सारं वर्षानुवर्षे बिनचूक...! आणि हेच सारं उद्ध्वस्त करून तिथं वेगळा आचार, वेगळा विचार, वेगळी प्रणाली रुजवायचा प्रयत्न इंग्रजांनी केला. त्यात ते ब-यापैकी यशस्वी झालेत, असं वाटायचं आणि समाजात, वंचित घटकांत हिंडू लागलो आणि स्तंभित व्हायची पाळी माझ्यावर वारंवार आली. भारताच्या कानाकोप-यात सर्वत्र मेकॉलेचा विचार पोहोचला नव्हता.
 
 
 
स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतात कोणताही दूरवरचा विचार न करता आम्ही अजूनपर्यंत... हो अगदी या घटकेपर्यंत आम्ही वेगवेगळ्या विचारधारांतूनसुद्धा मेकॉलेच पसरवतोय्! मेकॉले किती घट्ट-चिवट हळूहळू पसरणारा- न दिसणारा. आपलाच वाटणारा चिवट दम्यासारखा मित्र... पण, अजूनही खूप मोठ्या प्रमाणात समाजात भारतीयत्व- भारतीय ज्ञान-भारतीय विद्या शिल्लक आहेत. खेड्यापाड्यात तुकाराम- ज्ञानेश्वर- कबीर- नामदेव शिल्लक आहेत. अगदी बुद्ध- महावीर- सत्य अहिंसा  अपरिग्रह सारं अजून भारतीय जीवनात शिल्लक आहेत. माजलेले तण- प्रदूषित जीवनशैली- विचारात घुसलेले विषमतेचे तण हे नीटपणे निगुतीने काढून टाकून भूमी स्वच्छ करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ, दीनदयाल, गौतम बुद्ध, महावीर, ज्ञानेश्वर, तुकाराम इत्यादी सर्व संत एकत्र करून एक नवी मांडणी व्हायला हवी. ही मांडणी संविधानाला धरून सार्वत्रिक करायला हवी. संविधान आणि नवे शैक्षणिक धोरण केवळ संसदेत मांडून, पारित होऊन चालणार नाही. ते ग्रामसभेतही मांडून त्याची चर्चा व्हायला हवी. समजावून सांगायला हवी.
 
भारतीय कायदे-कलम सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. गाव हा घटक सक्षम व्हायला हवा. गावाच्या समस्या, सामाजिक- आर्थिक यांचा विचार गावपातळीवरच व्हायला हवा. शिक्षणाने गाव आत्मनिर्भर कसे होईल, याचा विचार- आराखडा तयार व्हायला हवा. गावाची सामाजिक, आर्थिक प्रश्नपत्रिका गावानेच, गाव पातळीवर सोडवायला हवी. ग्रामपंचायती, ग्रामसभा या न्याय पंचायती न्यायसभा बनायला हव्यात. संरक्षण, परराष्ट्र धोरण, मोठे उद्योग, दळणवळण, रस्ते इ. केंद्राकडे राहावेत. लघु उद्योग न्याय- शिक्षण- कृषी धोरण ग्राम रचनेकडे असावेत. या दृष्टीने शिक्षणाची रचना होणं गरजेचं आहे. स्वराज्य- स्वातंत्र्य याचा अर्थ ग्रामपातळीवरच समजायला हवे. ग्रामपातळीवर न्याय, शिक्षण आणि आर्थिक विकास याचा समन्वय शिक्षणात या सर्व बाबींचा समावेश व्हायला हवा. शिक्षण-कृषी-आरोग्य, लघुउद्योग, वनौपज पशुधन आणि जमीन या सर्वांचा ग्रामपातळीवरूनच नियोजनाद्वारे विचार व्हायला हवा. नीती आयोगाचा प्रयोग-ग्राम नीती व्यवस्थाद्वारेच सर्व पार पडायला हवे. आज या सर्वच बाबतीत विस्कळीतपणा आहे.
 
या सर्व बाबींचा विचार गुरुकुल शिक्षण पद्धतीत व्हायला हवा. असा विचार करून गेली काही दशकं काही जण गाव घटक मानून कार्यरत आहेत. पुनरुत्थान विद्यापीठ (गुजराथ), शिवगंगा अभियान (झाबुआ) गुजरात, भारतीय शिक्षण मंडळ- दीनदयाल शोध संस्थान, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, ज्ञानप्रबोधिनी- स्वरूपवर्धिनी यासारख्या अनेक संस्था काम करीत आहेत, प्रयोग करीत आहेत. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्ची सुरुवात या सर्व विचारांनीच झाली. सध्याची शैक्षणिक रचना किंवा नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे शैक्षणिक रचना करताना भारताच्या पारंपरिक कला-कौशल्याचा, समाज जीवनाचा, जीवनशैलीचा, ग्रामपातळी, पंचक्रोशीचा विचार करून शिक्षणाची रचना आधुनिक काळाला योग्य कशी होईल, याचा विचार करून ज्ञानदान अनुभवावर आधारित करण्यासाठी गुरुकुलम्मध्ये सुरुवातीपासूनच प्रयत्न झाला.
 
यासाठी समरसतेचा विचार आणि गुरुकुलम् पद्धती यांची सांगड घालण्याचे ठरले. प्रयोग हा केवळ एक प्रयोग न राहता तो सर्वांना सुलभतेने करता यायला हवा. परीक्षा पद्धतीचा विचार करायला हवा. निवासी-अनिवासी शाळांतून हे करताना कोणतीही अडचण यायला नको. शिक्षक- आचार्य- गुरू अशी एक मोठी रचनाच करायला हवी आणि तिथेच सारं काम अडलं. कामातली पहिली अडचण आली. ती माझी प्रतिमा...! मी आणि भटके- विमुक्त- पारधी- विमुक्त, जाती- जनजाती यांचेच काम करणारा. केवळ सामाजिक कार्यकर्ता. शिक्षणातलं काय कळतंय्? असा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. व्यापक पाqठबा, सहकार्य यामुळे मर्यादित झालं. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, त्याची उभारणी ३० वर्षांपूर्वी (आता ५० वर्षे झाली) मीच अभाविपचे, संघाचे काम करताना अनेक जणांना घेऊन केली होती. त्यामुळे संस्थेची अडचण नाही आली. मधल्या काळात १९८० ते २००५ या काळात मी समरसता मंच- भटके विमुक्त विकास परिषदेच्या कामामुळे परिचित झालो होतो. संघ परिवारासह सामाजिक क्षेत्रात एक व्यापक पाठिंबा , सहमती विविध परस्पर विरोधी विचारधारेतून मिळत गेली. तरीही एक घटक सर्वतोपरी सर्व पातळीवर विरोध करीत होताच.
 
या सर्व अडथळ्यांवर मात करीत गुरुकुलम्ची सुरुवात झाली. डॉ. विजय भटकर, पं. गाडगीळ, रमेश पतंगे आणि डॉ. अशोकराव कुकडे यांच्या उपस्थितीत, ९ जून २००६ शिवराज्याभिषेक दिनी. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या आत्मचरित्रात एक वाक्य आहे. ‘इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दूध नसून पुतना मावशीचे दूध आहे. ते सर्वतोपरी टाळायला हवे.' याचवेळी एक अभ्यासवर्ग अभ्यासक्रमासाठी घेतला. त्यातही इंदुमती काटदरे, डॉ. वामनराव अभ्यंकर, दिलीपराव केळकर, प्रकाश आणि कल्पना क्षीरसागर, विवेक पोंक्षे, मोहन धर्मे, प्रभाकर लिमये अशांच्या समवेत सत्तरेकजण शिक्षक चापेकर शाळा तसेच इतर शाळेतले आले होते. पाच दिवसांच्या या वर्गाबरोबरच मी यमगरवाडीवरून निघाल्यामुळे काही पारधी पालकांनी आपली मुले qचचवडला माझ्या घरीच आणून सोडली. अनेक समस्याग्रस्त पालकांची मुले पण आली. कुंभार-गाडी लोहार, घिसाडी, चित्रकर्मी, मरीआईवाले अशी वंचित घटकातील मुलेही आली. दलितही आली. 
 
पूर्वज्ञानावर आधारित प्रथम महिनाभर प्रत्येकाची माहिती तपशीलवार गोळा करायची ठरली. गुरुकुलाची प्रथम शिक्षिका म्हणून पूनम गुजर याही रुजू झाल्या. आसाराम कसबेसह कामाला सुरुवात झाली. सर्व घटकांना प्रवेश द्यायचा. शिक्षण नि:शुल्कच राहील. पहाटे ४ पासून सुरुवात करून रात्री ८ ला संपवायचे ठरले. आज १५ वर्षांनंतर गुरुकुलात साडेपाचशे मुलं शिकतात. अभियांत्रिकी, आयुर्वेद, कुंभकाम (पॉटरी), कृषी, गोविज्ञान- वास्तुरचना (आर्किटेक्ट), गोशाळा, शिल्पकला, संगीत गायन-वादन-नृत्य, भगवद्गीता, वेद, उपनिषद, ज्ञानेश्वरी-तुकारामबुवांची गाथा, रामायण, प्लम्बिंग, वेल्डिंग, कास्टिंग, ओतकाम, बांबूकाम अशा विषयांबरोबरच शालेय विषय मराठी, संस्कृत, हिंदी, विज्ञान-पारंपरिक विज्ञान, गणित-वैदिक गणित, क्रीडा नैपुण्य अशा एकूण २५ विषयांची विभागणी सात दिवसांच्या दिनक्रमात बसवून दिनक्रमाची तीन सत्रांत विभागणी करून गुरुकुल सुरू झाले.
 
आज १५ वर्षांनी असे दिसते. तीसेक मुली ईशावास्य, कठोपनिषदाबरोबरच ज्ञानेश्वरीचे अध्याय मुखोद्गत, गायन-वादन-नृत्य, ओतकाम-पितळी, मधुबनी-वारली, आयुर्वेद अशा अनेक विषयांबरोबरच पारंगत होऊन बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्क्यांवर गुण मिळविणा-या मुली व मुले या शिक्षणाबरोबरच १२ वर्षांच्या काळात आचार्य शिक्षणक्रम पूर्ण करून शिक्षकांचेही काम करू लागले. चार भाषांबरोबरच पारधी (वाघदी), कानडी, तेलुगु भाषाही त्यांना अवगत झाल्यात. गुरुकुलम्चा पहिला टप्पा पार पाडताना आधुनिक पाठशाळेने उद्ध्वस्त होत जाणा-या तीन कलांचे पुनरुज्जीवन करून आता तीनही ठिकाणी कला विषयाची गुरुकुलं सुरू होतील. एक धातुकामाचे तेलंगणात, पितळीच्या कलाकुसरीच्या वस्तूची गोंड समाजाची वस्ती तर तिसरे कोलकात्याजवळच्या पटचित्रकलेचे गुरुकुल; याचबरोबर याच कलाकौशल्यावर आधारित दौंड-काष्टी या ठिकाणी प्रत्यक्ष एक कौशल्य उद्योग वसाहत उभी राहात आहे. या सर्व गुरुकुल शिक्षणातून तयार होणारा वेगळा पण पारंपरिक उद्योग-व्यवसाय प्रधान भारतीय समाज. अगदी अल्प- छोटासा प्रयत्न...
तुझे तेज अंगी
शतांशे जरीही...
उजळवून टाकू दिशा दाही दाही...!