झटपट व्हेज बिर्याणी

    दिनांक :16-Nov-2021
|
- कुकरमध्ये झटपट व्हेज बिर्याणी

बिर्याणी (biryani) म्हणजे किचकट आणि काहीसा अवघड पदार्थ ! पण, एकदा साहित्याची जमवाजमव झाली की, बिर्याणी झटपट बनते. कशी ? खाली दिले आहे साहित्य आणि कृती ...!
 

biryani f_1  H
 
 
साहित्य
मसाले
- १/२ तमालपत्र, दालचिनी, लवंगा, काळी मिरी, चक्रीफूल
- बिर्याणी मसाला, धणेपूड, तिखट, हळद, जिरं, बिर्याणी मसाला
- चवीनुसार मीठ
 
भाज्या
- उभे चिरलेले कांदे
- १ चमचा आलं-लसूण पेस्ट
- चार कांद्याचे सुकलेले काप
- हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, सोलून चिरलेला बटाटा, फुलकोबीचे तुरे, गाजराचे तुकडे, श्रावण घेवडा, १/२ कप ताजे वाटाणे
 
इतर साहित्य
- २ कप अख्खा बासमती तांदूळ
- २ चमचे तेल
- साजूक तूप
- २५० ग्रॅम्स पनीर
- थोडे काजू
- दही
- पाणी
 
कृती : सर्वप्रथम पनीरचे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन त्यात तिखट, धणेपूड, मीठ, अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर घालून मॅरेनेट करून बाजूला ठेवून द्या. आता बासमती तांदूळ (जुना असल्यास उत्तम! तो चिकट येत नाही.) हे तांदूळ ३ ते ४ वेळा पाणी बदलू स्वच्छ धुवून घ्यावेत. आता पूर्ण तांदूळ बुडतील इतकं पाणी घालून किमान अर्धा तास तांदूळ भिजवून ठेवावेत.
 
गॅसवर कुकर ठेवून त्यात दोन चमचे तेल तापवून त्यात एक चमचा तूप घालावे. यात काजू छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. कांद्याचे पातळ काप करून तळून घ्यावेत. आता त्या तेलात जिरं, तमालपत्र आणि दालचिनी, लवंगा, चक्रीफूल आणि काळी मिरी घाला. आता त्यात ३ ते ४ कांदे पातळ काप करून घालावेत. आलं-लसूण वाटण, तिखट, हळद आणि बिर्याणी मसाला प्रत्येकी एक चमचा घालून छान परतून घ्यावे. सगळे मसाले छान परतून झाले की त्यात चार चमचे दही, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदीन्याची पाने घाला. दोन-तीन मिनिटे परतून त्यात बटाटे, फुलकोबी, गाजर, श्रावणी घेवडा आणि हिरवे मटार सोबतच मॅरीनेट केलेलं पनीर घालून परतून घ्या.
 
ज्यांचे मोठे तुकडे करावेत. आता या मिश्रणावर पाण्याचा शिपका द्यावा आणि थोडंसं मीठ घालावं. कुकरमध्ये हा मसाला खाली नीट पसरवून घ्या. त्यावर धुवून ठेवलेले तांदूळ पाणी पूर्णपणे काढून, भाज्यांवर नीट पसरवून घ्या. दोन कप तांदूळ असतील तर तीन कप पाणी घ्या. तांदळाच्या वर साधारण एक बोटभर पाणी राहील, या अंदाजाने पाणी घाला. आता यात चवीनुसार मीठ घाला. फार न ढवळता हलक्या हाताने मीठ मिसळून घ्या. त्यावर दोन मोठे चमचे साजूक तूप घालून कुकरचे झाकण लावून घ्या आणि मध्यम आचेवर एकच शिटी होऊ द्यायची. बिर्याणी तयार आहे. त्यावर तळलेले काजू आणि कांद्याचे काप घालून सव्र्ह करा व्हेज बिर्याणी !
 
टिप - उन्हाळ्यात कांद्याचे काप करून ते वाळवून बरणीत भरून ठेवा. बिर्याणीसाठी हे सुकविलेले कांदा काप वापरता येतील.