बाबासाहेब पुरंदरे...

इतिहास आणि वर्तमानाची जाग आणणारा अवलिया

    दिनांक :21-Nov-2021
|
बाबासाहेब उभारत असलेल्या शिवसृष्टीची जागा १९९५ किंवा १९९६ साली संस्थेला देण्यात आली होती. मी ‘ओंजळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने बर्‍याच वर्षांनी या शिवसृष्टीमध्ये आलो. इथे दाखल होत असताना मला बाबासाहेबांनी शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर साकारलेली शिवसृष्टी आठवली. ते साल होतं १९७४. त्यावेळी अवघ्या सहा वर्षांचा असलेला मी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी रोज त्या शिवसृष्टीत जात असे. बाबासाहेबांनी शिवसृष्टीमध्ये आणलेल्या भवानी तलवारीचं स्वागत करायला मी माननीय बाळासाहेब ठाकरेंसह उपस्थित होतो. त्यावेळी वयाच्या सहाव्या वर्षी मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला सर्वप्रथम पाहिलं. त्यानंतर अनेक वर्षं मी बाबासाहेबांना पाहात आलो. त्यांचं लिखाण वाचत आणि त्यांना ऐकत आलो. नंतरच्या काळात मी त्यांना भेटू लागलो. त्यांच्या सहवासात राहू लागलो. बाबासाहेबांसारख्या थोर व्यक्तीचा सहवास लाभणं हे खरं तर माझं भाग्यच! मी त्यांच्याकडून बरंच काही शिकलो. बाबासाहेबांची अनेक रूपं आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा, अनेक पैलू आहेत. ‘शिवसृष्टी’मध्ये मी त्यांच्यातला कलाकार पाहिला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा कलाकार आजारी पडल्यानंतर खुद्द बाबासाहेबांनी महाराजांची भूमिका केली होती. त्यांचं ते रूप, तो प्रसंग मला अगदी लख्ख आठवतो.
 
 
purandare-babasaheb08_1&n
 
माझ्या आजवरच्या आयुष्यात बाबासाहेबांच्या भेटीचे अनेक प्रसंग आले. मनात साचलेले अनेक प्रश्न मी त्यांना विचारले. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांमधून इतिहासातलं बरंच काही समजत गेलं. बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिलं. छत्रपतींचा इतिहास जगासमोर आणला. बाबासाहेबांनी लिहिलेला, सांगितलेला इतिहास रूक्ष वाटत नाही. त्यांच्या इतिहासाला वर्तमानाचे संदर्भ असतात. ते इतिहास सांगताना वर्तमानाचं भान जागवत असतात. इतिहासातल्या विस्मृतीत गेलेल्या चांगल्या घटनांना उजाळा देत असतात आणि त्या काळात घडलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, हेही सांगत असतात. बाबासाहेब इतिहासाची सांगड वर्तमानाशी कशी घालतात, हे दाखवून देणारा एक प्रसंग मी नमूद करतो. आपण नुसता इतिहास ऐकायला गेलो तर फार रूक्ष वाटतो. परंतु, बाबासाहेबांनी सांगितलेला इतिहास अगदी नीट लक्षात राहतो. एखाद्या स्क्रूप्रमाणे डोक्यात फिट्ट बसतो. बाबासाहेबांनी एका व्याख्यानात शिवाजी महाराजांच्या पत्रातला दाखला सांगितला. ‘कारभार ऐसे करणे जे रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे’ असा हा दाखला बाबासाहेब फक्त शांतपणे सांगून थांबत नाहीत तर पुन्हा ओरडूनही सांगतात आणि इतकं जोरात ओरडूनदेखील हे आपल्या मनाला कधी कळणार आहे का, असा प्रश्नही उपस्थित करतात. महाराजांच्या पत्रातल्या या ओळी प्रत्येक मामलेदार कचेरीत लिहून ठेवाव्याशा वाटतात, असंही ते सांगून जातात. ‘रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे’ हे महाराजांनी त्या काळात लिहून ठेवलेलं वाक्य आजच्या काळालाही कसं लागू पडतं, हे बाबासाहेब अगदी सहज सांगून जातात. म्हणूनच बाबासाहेब हे इतिहासासोबतच वर्तमानाचीही जाग आणणारे महापुरुष आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेलं शिवचरित्र नुसतं इतिहास म्हणून वाचण्यात काहीच अर्थ नाही. त्या इतिहासामधून बाबासाहेब काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा तो फक्त इतिहासच राहील.
 
 
बाबासाहेबांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगावं, लिहावं तितकं कमीच. बाबासाहेब नेमके कसे आहेत, हे जाणून घेण्यासाठी पु. ल. देशपांडे यांच्या ‘गणगोत’ पुस्तकातला बाबासाहेबांवरचा लेख आपण वाचायला हवा. तो लेख मी अनेकदा वाचला आहे. बाबासाहेब आणि पु. लं देशपांडे ही दोन्हीही आपली श्रद्धास्थानं. पुलंचा हा लेख प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अंगाने वाचावा असं वाटतं. या लेखात पुलंनी बाबासाहेबांचं एक वाक्य नमूद केलं आहे. हे वाक्य फारच सुंदर आहे. ‘आमच्या माता-भगिनींच्या गर्भापर्यंत हा इतिहास पोहोचला पाहिजे’, असं बाबासाहेब म्हणतात. छत्रपतींचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता, भारतापुरता किंवा जगापुरता मर्यादित नाही तर तो येणार्‍या पिढ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि यासाठीच बाबासाहेब अत्यंत तळमळीने हे कार्य करीत आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचविणारी बाबासाहेब ही महाराष्ट्रातली एकमेव व्यक्ती असावी. अनेकांनी महाराजांवर पुस्तकं लिहिली, अनेकांनी त्यांचा इतिहास सांगितला. पण बाबासाहेबांची इतिहास सांगण्याची पद्धत विलक्षण असल्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात घर केलं. तसं पहायला गेलं तर महाराजांच्या इतिहासाचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडच्या कोणीही करून ठेवलेलं नाही तर ते बाहेरच्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यांची कागदपत्रं वाचून आजवर इतिहास आपल्या समोर आणला गेला. बाबासाहेबांसारखा तेव्हाचा तरुण या क्लिष्ट कागदांंच्या मुळाशी गेला, आतमध्ये शिरला आणि हा क्लिष्ट स्वरूपात लिहिलेला इतिहास अत्यंत सरळ, सोप्या आणि साध्या पद्धतीने त्यांनी लोकांसमोर आणला.
 
 
बाबासाहेबांसोबतचे अनेक प्रसंग मला आठवतात. एकदा मी त्यांच्या घरी गेलो असताना तळमजल्यावर बाबासाहेब आणि अजून एक जण बसले होते. अनेक जुन्या तलवारी बाबासाहेबांच्या पुढ्यात होत्या. त्यातली एक, एक तलवार घेऊन बाबासाहेब स्वच्छ करीत होते. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. मला बघून बाबासाहेबांना आनंद झाला. बाबासाहेब इतिहासातला बारीकसारीक तपशील कसा उलगडून सांगतात याची प्रचीती मला त्यावेळी आली. त्या तलावारींवर काही छिद्रं दिसत होती. बाबासाहेबांनी त्या छिद्रांचं महत्त्व मला सांगितलं. ते म्हणाले, तलवारीवरचं एक छिद्र म्हणजे लढाईत १०० माणसं मारल्याचं प्रतीक, दोन छिद्रं म्हणजे २०० तर तीन छिद्रं म्हणजे ३०० माणसं मारल्याचं प्रतीक. बाबासाहेबांमुळेच हे सगळं कळू शकलं. बाबासाहेबांचं बोलणं ऐकल्यानंतर आपल्या मावळ्यांचा अधिक अभिमान वाटू लागतो.
 
 
आपल्याला आवडेल, रूचेल, समजेल अशा पद्धतीने बाबासाहेब इतिहास सांगतात. शाळेत असतानाही आपण इतिहास वाचलेला असतो. पण आपल्या इतिहासाकडे कशा अंगाने आणि दृष्टीने बघावं हे बाबासाहेबांमुळे कळतं. बाबासाहेबांनी नेहमीच खरा इतिहास लोकांसमोर आणला. त्यांच्या भाषणांमध्ये, व्याख्यानांमध्ये, पुस्तकांमध्ये दंतकथांना स्थान नसतं. लोकांना समजावं, रूचावं म्हणून ते अलंकारिक भाषेतून इतिहास समजावतात. यासाठी देवगिरी किल्ल्याचं उदाहरण देता येईल. रावणाला सीतेच्या हृदयात शिरणं जितकं कठीण होतं, तितकं मुघलांना देवगिरी किल्ल्यात शिरणं कठीण होतं, असं बाबासाहेब सांगून जातात. बाबासाहेबांनी केलेलं हे वर्णन ऐकल्यानंतर मुघलांसाठी देवगिरी किल्ल्यात शिरणं किती अवघड असावं हे आपल्या मनावर अगदी सहज ठसतं.
 
 
बाबासाहेब गेली अनेक वर्षं अशा पद्धतीने इतिहास सांगत आले. शिवचरित्र अनेकांनी लिहिलं. पण बाबासाहेबांनी ते घराघरांत, मनामनांत पोहोचवलं. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात, जगभरात पोहोचवलं. त्यांनी विस्मृतीत गेलेला इतिहास समोर आणला. व्याख्यान, पुस्तक तसंच नाटकाच्या रूपाने त्यांनी आपल्या देदीप्यमान इतिहासाची नव्याने जाणीव करून दिली. रायगडावर घेतलेल्या मुलाखतीत ‘तुम्ही कधी पोवाडा म्हटला आहे का’, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर त्यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. पोवाडा न म्हणताही तुम्ही शिवशाहीर कसे, असा प्रतिप्रश्न मी त्यांना केला होता. बाबासाहेब इतिहास संशोधक असले, तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही रूक्षपणा नव्हता. इतिहास समाजाला समजावा, कळावा आणि या इतिहासातून समाजाने काही बोध घ्यावा यासाठी ते आयुष्यभर झटत आले. त्यांच्या या कार्याचं, तळमळीचं मोल कधीही करता येणार नाही.