गडचिरोली पोलिसांचे सी-६० कमांडोज

माओवादी विरोधी अभियान राबविण्यात एक उत्कृष्ट दल

    दिनांक :21-Nov-2021
|
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
१२-१३ नोव्हेंबरला माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत सी-६० जवानांनी ९ तास झुंज देऊन २६ माओवाद्यांना ठार केले. ठार माओवाद्यांमध्ये केंद्रीय समितीचा सदस्य तथा महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगडची जबाबदारी असलेला मास्टरमाईंड मिलिंद तेलतुंबडे, विभागीय समिती सदस्य लोकेश मडकाम, कसनसूर दलम कमांडर तथा विभागीय समिती सदस्य महेश गोटा यांचा समावेश आहे. यापैकी १६ जणांची ओळख पटली आहे.
 
 
c-60-commandos_1 &nb
 
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर मर्दिनटोला जंगलातील चकमकीत पोलिसांकडून ३०० वर कमांडो सहभागी झाले होते तर १०० पेक्षा अधिक माओवादी गोळीबार करीत होते. २६ माओवादी मारले गेले तर बाकीचे पळून गेले. माओवाद्यांकडून ५ एके-४७, एक एकेएम युबिजिअल, ९ एसएलआर रायफल, तीन ३०३ व इतर साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक युवक चळवळीत भाग घेत नसल्याने ४० टक्के माओवादी परराज्यातून येत आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती देणार्‍या खबर्‍याला या माओवाद्यांवर राज्य सरकारच्या वतीने ठेवण्यात आलेले बक्षीस देण्यात येणार आहे.
 
 
सी-६० कडून मोठं ऑपरेशन
माओवाद्यांच्या विरोधातील सर्वात मोठं ऑपरेशन गडचिरोलीत झालं होतं. माओवादी जंगल परिसरातीलच राहणार्‍या लोकांना भरती करतात. त्यामुळे माओवाद्यांविरोधात लढण्यासाठी तेथील भाषा, रस्ते इत्यादी गोष्टींची माहिती असणारे जवान आपल्याकडे असणं गरजेचं होतं. त्यातूनच १९९० सालच्या सुमारास सी-६० ची संकल्पना उदयास आली. हे याच जंगल परिसरातील तरुण मुले आहेत. यांचे नातेवाईक जंगलातच राहणारे, तिथलीच भाषा बोलणारे आणि तिथले रस्ते ओळखणारे असतात. म्हणून त्यांना जंगलातील प्रत्येक कोपर्‍याची माहिती असते. माओग्रस्त प्रभावित क्षेत्रातील तरुणांची निवड करून, १९९० साली सी-६० ची पहिली तुकडी तयार करण्यात आली. त्यावेळी ६० जणांचा पहिल्या तुकडीत समावेश होता, म्हणून सी-६० असे नाव पडले होते. पुढे तुकडीतील जवानांची संख्या वाढली, तरी नाव सी-६० राहिलं. सी-६० च्या जवानांना खास जंगलातील कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे जंगलातून वजनदार शस्त्र घेऊन किंवा जखमी साथीदारांना घेऊन फिरणं, हे नेहमीचंच आहे. सी-६० च्या जवानाला स्वत:चं नाव उघड न करण्याचे बंधन आहे. कारण कुटुंबीयांना कायम माओवाद्यांकडून धोका असतो.
 
 
एक सी-६० जवान गावातून या फोर्समध्ये गेला म्हणून माओवाद्यांनी त्याचे वडील, मोठा भाऊ, काका आणि चुलत भाऊ अशा अनेकांची हत्या केली. उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवलं. शेकडो सी-६० जवान असे आहेत, ज्यांच्या घरातील एका तरी व्यक्तीची ते या फोर्समध्ये गेले म्हणून माओवाद्यांनी हत्या केली. या फोर्समध्ये भरती तर झाले; पण त्यांच्या उरलेल्या परिवाराला आपापली गावं आणि जमिनी सोडून पळावं लागलं आहे. सी-६० मध्ये स्थानिक आदिवासी तरुण आहेत. त्यांचेच रक्ताचं नातं असलेले हे त्यांच्या नक्षली दलामध्ये कार्यरत असतात. त्याग, धैर्य आणि शौर्य याचं उदाहरण म्हणजे सी-६० आहे.
 
 
कठोर परिश्रम घेऊन लढण्याची तयारी
सी-६० जवानांना जंगलातील चकमकीसाठी प्रशिक्षित केले जाते. या जवानांना हैदराबादमधील ग्रे-हाऊंड्स, मानेसरमधील एनएसजी आणि पूर्वांचलमधील आर्मीच्या जंगल वॉरएअर स्कूलमध्ये ट्रेनिंग दिले जाते. त्यांना विशेष शस्त्रे दिली जातात. जंगलात अनेक दिवस जेवण, पाणी न घेता ते कारवाई करू शकतात. प्रत्येक जवानाकडे १५-२५ किलो वजन असते. यात जेवण, पाणी, औषध आणि अन्य साहित्य असते. १९९४ साली सी-६० च्या दुसर्‍या मुख्यालयाची स्थापना झाली. सी-६० चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील माओ चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे.
 
 
प्रशिक्षित सी-६० येथील जवान कठोर परिश्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात जाऊन पहाडी व अतिदुर्गम भागामध्ये माओविरोधी अभियान राबवितात. दरम्यान, माओ चळवळीमध्ये असणार्‍यांच्या परिवाराला व नातेवाईकांना भेटून त्यांना आत्मसमर्पणाबाबत विविध शासकीय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्यास त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना लोकशाहीच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. कट्टर माओवादी शासकीय योजनेला व लोकशाहीला विरोध करून लोकांना शासनाविरुद्ध भडकवतात. अशा जहाल व कट्टर माओवाद्यांचा शोध घेऊन खात्मा केला जातो तसेच दुर्गम भागामध्ये जाऊन जनसंपर्क साधून शासनाचे विविध धोरण लोकांसमोर मांडून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सी-६० योग्यरीत्या पार पाडत आहे.
 
 
माओवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम व जंगल भागात अशा ठिकाणी अनेक शासकीय अधिकारी/ कर्मचारी जात नाही, अशा गावात सी-६० पथके जाऊन तेथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतात. जसे वीज, रस्ते, तलाव, बोअरवेल, आरोग्य, शाळा, बससेवा. मुख्यालय येथे आल्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगून संबंधित कार्यालयाकडून सदरची कामे व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो.
 
 
यु. ओ. टी. सी. अतिशय खडतर प्रशिक्षण
सी-६० पथके रिझर्व्ह असताना शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्याकरिता दररोज सकाळी शारीरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात तसेच त्यांना माओविरोधी अभियान राबविण्याकरिता वेळोवेळी माओ टॅक्टीसबद्दलची माहिती दिली जाते. नैतिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी मोटिवेशन लेक्चर, कमांडो मुव्हीज दाखविण्यात येते. सी-६० पथकाला अतिदुर्गम, संवेदनशील व पहाडी भागात ऊन, वारा, पाऊस, दिवस व रात्री येणार्‍या आव्हानांना व समस्यांना तोंड देण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी त्यांना उच्च, विशेष व आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीचे प्रशिक्षण विविध राज्यातील प्रशिक्षण संस्थेमध्ये दिले जाते.
 
 
जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी यु. ओ. टी. सी. नागपूर पाठविले जाते. त्यांना इथे जे प्रशिक्षण दिले गेले, त्यामध्ये स्मॉल टिम्स ऑपरेशनचे प्रशिक्षण हे महत्त्वाचे होते. असे बघितले गेले आहे की, माओवादी भागात पोलिस हे रक्षात्मक पद्धतीने ऑपरेशन करतात. अर्धसैनिक दले आक्रमक कारवाईकरिता फारशी तयार नसतात. सी-६० ची सगळी ऑपरेशन ही अत्यंत आक्रमक आणि धोकादायक होती आणि आहेत. याकरिता उत्तम दर्जाचे प्रशिक्षण जरूरी आहे. स्वतःवर, स्वतःच्या शस्त्रावर, सहकार्‍यांवर आणि स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तरच अशा प्रकारचे कठीण ऑपरेशनमध्ये विजय मिळू शकतो.
 
 
शौर्य, धैर्य आणि कठीण परिस्थितीमध्ये जिंकण्याची मानसिकता
ज्या माओवादाने देशातील १०० जिल्ह्यांमध्ये आपली पाळेमुळे घट्ट केली होती, तो माओवाद आता ३० ते ४० जिल्ह्यांपुरता मर्यादित झाला आहे. सी-६० ने केलेल्या या ऑपरेशनचे नियोजन उत्तम होते. गुप्तहेर माहिती अचूक होती. लष्करी डावपेच उत्तमरीत्या वापरले गेले. फायरिंग डिसिप्लिन उत्कृष्ट दर्जाची होती. दाखवलेले नेतृत्व, शौर्य, धैर्य आणि कठीण परिस्थितीमध्ये जिंकण्याची मानसिकता उत्तम दर्जाची होती. कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी विलंब लागतो. एखादे काम चिकाटीने आणि सातत्याने केले तर आज ना उद्या यश मिळतेच, हेच आजच्या घटनेवरून सिद्ध झाले. चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये छत्तीसगड व महाराष्ट्रातील १ कोटी ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा समावेश आहे. हे बक्षीस चकमकीत सहभागी असलेल्या सी-६० जवानांना त्वरित मिळवून दिले पाहिजे. यापूर्वीही सी-६० ला यश मिळत आलेले आहे. पण आजचे यश त्या साखळीत सर्वात उजवे आहे.
 
 
सी-६० कमांडोजना प्रत्येक ऑपरेशननंतर पुरेशी विश्रांती दिली जावी. त्यांचे काम उच्च दर्जाचे आहे, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा जंगलात पाठवू नये. इतर पोलिस दलांनीसुद्धा त्यांच्यावर असलेला भार सांभाळावा. त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित जागी हलवले जावे. गडचिरोलीमध्ये तैनात असलेल्या अर्धसैनिक दलांनी अधिक आक्रमक व्हावे. छत्तीसगड, ओडिशा, झारखंडमधील सुरक्षा दलांनीसुद्धा आक्रमक कारवाई करून अबुजमाड जंगलात असलेले माओवाद्यांचे ट्रनिंग कॅम्प उद्ध्वस्त करावेत; तरच माओवादावर नियंत्रण करता येईल.

(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
- ••९०९६७०१२५३