अविस्मरणीय बाबासाहेब !

    दिनांक :21-Nov-2021
|
- भय्याजी जोशी
अ. भा. कार्यकारिणी सदस्य, रा. स्व. संघ
 
आपल्या देशामध्ये ज्ञानी, वक्ते, लेखक, ऐतिहासिकदृष्ट्या भ्रमण करणारे... अशी बरीच मंडळी आपल्याला अवतीभवती दिसतात. परंतु, या सर्वांपेक्षा वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून स्व. बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचे जीवन राहिलेले आहे. शंभरीच्या उंबरठ्यावर आले असताना, त्यावेळी त्यांचे झालेले दर्शन, हे कुठल्याही तरुणाला शोभेल अशा प्रकारचे होते. गेल्या वर्षी, व्यावहारिकदृष्ट्या बाबासाहेबांनी शंभर वर्षे पूर्ण केली असली, तरी ते मनाने, विचारांनी, आचरणाने कुठल्याही तरुणापेक्षा कमी नव्हते. बालपणापासून संघाचे स्वयंसेवक असलेल्या बाबासाहेबांनी काही काळ प्रचारक म्हणूनही कार्य केले आहे. संघ-संस्कारातून (rss) त्यांनी जीवनाचा मार्ग निश्चित केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chatrapati shivaji maharaj) चरित्र-कथनाच्या माध्यमातून राष्ट्रकार्याचे काम स्वीकारले व शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहिले.
 

asa_1  H x W: 0 
 
बाबासाहेब पुरंदरेंच्या जीवनामध्ये केवळ इतिहासाचा अभ्यास नाही; केवळ प्रभावी प्रस्तुती नाही, तर त्यांचे ज्ञान, हे अनुभवाच्या कोंदणात बसलेले ज्ञान आहे. एकदा आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य देव म्हणून स्वीकारल्यानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी ते एकरूप झाले होते. बाबासाहेब म्हणायचे ‘शिवाजी' या तीन अक्षरांमध्ये माझं जीवन आहे. आणि म्हणून, इतक्या वर्षांनंतर आपल्या सहजपणे लक्षात येते की, बाबासाहेब पुरंदरे म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज समोर उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण काही ऐकावे, असा विचार जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंपेक्षा वेगळे नाव समोर येत नाही.
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन समजून घ्यायचे म्हणून त्यांनी आपल्या जीवनाची जी रचना केली, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासकाळात जाऊन, त्या सर्व प्रकारच्या परिस्थितीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकच उदाहरण सांगायचे झाले, तर देशभरात शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी गेलेत, त्या त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष जाऊन आलेत. त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन येणे यात विशेष नाही, परंतु ज्या मार्गाने छत्रपती गेलेत, त्या मार्गाने बाबासाहेब पुरंद-यांनी प्रवास केला आहे. द-या-डोंगरांमध्ये, अत्यंत अवघड वाटेवरती, पहाडांमध्ये, जंगलांमध्ये... कधी पायी तर कधी वाहनांनी आणि ब-याच वेळा घोड्यावर बसूनही त्यांनी अशी यात्रा केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून त्यांनी काही घेतले असेल तर ते साहस घेतले आहे, पुरुषार्थ घेतला आहे. त्यांच्या जीवनातून निष्ठा घेतली आहे आणि जीवनाच्या अंतापर्यंत ते अशाच पद्धतीने जीवन जगले. असे एक श्रेष्ठ जीवन म्हणून बाबासाहेब पुरंद-यांचे नाव आहे.
 
प्रसंगांची सहेतुक निवड
शिवाजी महाराजांबद्दल मांडणी करीत असताना, व्यक्तित्वाची उत्तुंगता मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. केवळ कथा नव्हे, तर त्यांच्या कथा ऐकत असताना, ऐकणा-यांच्या जीवनालादेखील दिशा मिळावी; प्रेरणा मिळावी आणि सामाजिक, राजकीय जीवनामध्ये कशा प्रकारचा व्यवहार असला पाहिजे, याचा संस्कारही ऐकणाèयांना मिळावा, ही त्यांची धडपड आणि प्रयत्न असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, ऐकणा-यांच्या हृदयात उतरविण्याचे कौशल्य असलेले ते वक्ते होते आणि म्हणून कथांची निवडदेखील त्यांनी विचारपूर्वक केली. रोहिडेश्वरावरची घेतलेली प्रतिज्ञा केवळ भावनेतून घेतलेली नव्हती, तर एका संकल्पाची ती परिणती होती आणि हा संकल्प महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वाला नेला. एक बाल आयुष्यामध्ये घेतलेला संकल्प आणि त्यासाठी करावे लागणारे सर्व प्रकारचे संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे. ते बाबासाहेबांनी अत्यंत प्रभावीपणे लोकांसमोर मांडले आहे.
 
डोळे उघडण्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधील जे काही महत्त्वाचे भाग आहेत, त्यातील शिस्त आणि अनुशासन तसेच आपल्या सवंगड्यांबद्दल, प्रामाणिक निष्ठा ठेवणा-यांबद्दल जी दृष्टी शिवाजी महाराजांची होती, ती बाबासाहेबांनी आपल्या प्रभावी वाणीने आमच्या समोर मांडली आणि एका अर्थाने असे जीवन असले पाहिजे अशा प्रकारचा संस्कार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनुशासन, वेळप्रसंगी शिवाजी महाराजांनी घेतलेली कठोर भूमिका, जीवनाकडे बघण्याची दृष्टी या संदर्भातले जे प्रसंग आहेत, ते मग जवळच्या नातेवाईकांना कठोर शिक्षा देण्याबद्दलचे असो किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सालंकृत सत्कार करून तिला परत पाठविण्याचे असो, असे अनेक प्रसंग बाबासाहेब मांडत असत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन मांडत असताना, आजच्या समाजामध्ये तरुणांनी कशा प्रकारे विचार केला पाहिजे, असा एक सहज संदेश बाबासाहेब तुम्हा-आम्हा सर्वांना देऊन जातात आणि म्हणून त्यांच्या मांडणीमध्ये अनुकरणीय काय, ते आचरणात आणण्याबाबत त्यांचा आग्रह असायचा. ‘जाणता राजा' या महानाट्याच्या निर्मितीमागेही त्यांची हीच भूमिका होती. ते म्हणत- ‘‘शिवाजी महाराजांच्या चरित्राने आपण दीपून जातो आणि डोळे मिटून घेतो. वास्तविक आपले डोळे उघडायला हवेत! महाराजांचे पुतळे उभारण्यात आणि शिवजयंत्या जल्लोषात साज-या करण्यातच आम्ही रमून जातो. त्यांच्या राज्यकारभाराचे, चारित्र्याचे, राष्ट्रउभारणीच्या भगीरथ प्रयत्नाचे आम्ही अनुकरण केव्हा करणार? ‘जाणता राजा'मध्ये या थोर राष्ट्रीय चारित्र्याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे तो अनुकरणाकरिता!''
 
बाबासाहेबांचा संकल्प होता की, या देशातली भविष्यातील पिढी मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आचरण करणारी, विचार करणारी अशी घडवायची आहे. म्हणून त्यांच्या वक्तृत्वाला, मी म्हटले की, एक वेगळ्या प्रकारची झालर आहे व ती झालर म्हणजे पुढची पिढी घडविण्याची धडपड. आपल्या कथाकथनातून हाच भाग प्रामुख्याने मांडण्याचा त्यांनी आयुष्यभर संकल्प केला होता. त्यामुळे केवळ संघर्ष नाही, तर राज्यव्यवस्था कशी असावी, वेळप्रसंगी कूटनीतीचा वापर कसा करावा, पुरुषार्थ जीवनामध्ये कसा असला पाहिजे, हे संस्कार पुढच्या पिढीला मिळत जावे म्हणून, छत्रपतींच्या जीवनातील असेच प्रसंग त्यांनी आपल्या व्याख्यानातून वेळोवेळी मांडले आहेत. बाबासाहेबांनी समाजासमोर दोन शब्दप्रयोग चालविले. काही राज्यकर्त्यांसाठी आहेत, काही समाजातल्या सामान्य लोकांसाठी आहेत, तर काही देशातल्या रणनीतिकारांसाठी आहेत. ‘जाणता राजा' असो वा ‘श्रीमंत योगी' या शब्दांचा वापर त्यांनी एका विशिष्ट हेतूने वारंवार केला, असे मला वाटते. राज्य कसे असले पाहिजे, राजा कसा असला पाहिजे, तो किती जागरूक पाहिजे हे सांगत असताना तो अंत:करणापासून एखाद्या योग्यासारखा असला पाहिजे, अशीच मांडणी त्यांनी आम्हांसमोर केली आहे.
 
कर्मठता
ज्या ज्या गोष्टी ते सांगत असत, त्या त्यांच्या व्यवहारात आम्ही बघितलेल्या आहेत. अनुशासनप्रिय असे बाबासाहेब आम्ही बघितले. एका कार्यक्रमाची वेळ नक्की झाली. बाबासाहेबांच्या सवयीप्रमाणे ते कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी पुरेसे आधी कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रमाची वेळ झाली त्यावेळी बाबासाहेब उभे झाले. ‘‘चला... वेळ झाली...'' पण अशा कार्यक्रमात आयोजकांना नेहमीच एक अडचण असते की, कार्यक्रमस्थळी कुणीच आले नसते. आयोजक म्हणाले- ‘‘आपण १५-२० मिनिटं थांबू आणि मग जाऊ''
बाबासाहेब म्हणाले- ‘‘काय, अडचण काय आहे? '' ‘‘नाही म्हटले, अडचण काही नाही...'' कधी कधी अडचण सांगणेदेखील आयोजकांना कठीण जाते. ‘‘अडचण काही नाही, तर आपण जाऊ या.'' बाबासाहेब अनुभवी असल्यामुळे त्यांना माहीत होते, अडचण काय आहे ती. ते सहजपणे बोलून गेले- ‘‘आपण मंचावर जाऊन बसू. तुम्हाला कार्यक्रम जेव्हा सुरू करायचा तेव्हा सुरू करा. पण मी वेळेवरती गेलोय् असं झालं पाहिजे.'' हा जो एक सहजगत्या कार्यकर्त्यांना दिलेला संदेश आहे की, कशा प्रकारची शिस्त आपल्या जीवनात असली पाहिजे, तो अनुकरणीयच आहे.
 
त्यांची व्याख्याने खूप झालीत. संख्या महत्त्वाची नाही. परंतु त्यांनी जेव्हापासून हे कथाकथन सुरू केले ते, जोपर्यंत त्यांच्या शरीरात शक्ती होती तोपर्यंत ते कथाकथन करीत होते. कथाकथनाच्या प्रारंभीच ते श्रोत्यांना निवेदन करीत असत की, जी वेळ ठरलेली आहे त्या वेळेलाच मी कथाकथन करायला उभा राहीन. माझी अपेक्षा आहे की, आपण सर्वांनी त्या वेळेला उपस्थित राहावे. दुसरे, कथा ऐकत असताना ती जर हृदयात उतरवून घ्यायची असेल, तर आपण आपले व्यक्तिगत व्यवहार कथा ऐकत असताना करू नये, अशी माझी विनंती आहे. मन पूर्ण एकाग्र करून कथा ऐकावी. तरच तुमच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन उतरू शकेल. तिसरे ते म्हणत असत की, माझी कथा संपण्याचीही वेळ नक्की आहे. एक क्षण मी त्याच्यापुढे जाणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की, आपण आलात तर शेवटच्या क्षणापर्यंत बसून राहावे. आपल्या हालचालींनी माझ्या बोलण्यात व्यत्यय येतो. त्यामुळे मला तुम्ही क्षमा करा, पण कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत बसून राहा. हजारो लोक नाही, लाखो लोकांचा अनुभव आहे की, त्यांनी कधीही उशीर केलेला नाही आणि कधीही ठरलेल्या वेळेच्या अर्धा क्षणदेखील ते पुढे गेले नाहीत. मी तर ऐकले आहे की, बèयाचदा वेळ संपताच ते वाक्य अर्धवट सोडून देत असत. ‘‘बाकीचे उद्या...'' असे म्हणून ते निघून जायचे. हा जो त्यांच्या जीवनामधला, मी याला कठोरपणा म्हणत नाही, ही कर्मठता आहे, ती कर्मठताही सहजपणे आपल्याला संदेश देते.
 
भव्य-दिव्याचाच ध्यास
शेवटच्या काळामध्ये गेली काही वर्षे, अनेक प्रकारच्या मर्यादा त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे आल्या होत्या. पण तशातही ‘जाणता राजा'सारखे एक महानाट्य त्यांनी निर्माण केले. मला असे माहिती आहे की, त्या ‘जाणता राजा'तल्या अगदी बारीकसारीक गोष्टी ठरविल्या होत्या. अगदी खिळा कुठे ठोकायचा, मंचाची सजावट कशी करायची, कुणी काय काम करायचे असे अगदी बारीकसारीक तपशील हे स्वत: बाबासाहेबांनीच तयार केलेले आहेत. ते कथानक जे आहे ते सर्व बाबासाहेबांनी आपल्या वाणीतून पुढे नेत. त्याच्याशी ते एकरूप होत असत. आणि दर्शकसुद्धा ‘जाणता राजा' बघत असताना त्या काळात कसे जाऊन पोहोचतील तसा प्रयत्न ते करीत. ‘जाणता राजा'सारखा भव्य-दिव्य प्रयोग भारताच्या नाट्य-जीवनात, नाट्यसृष्टीमध्ये पहिला प्रयोग आहे. इतके मोठे शिवधनुष्य त्यांनी उचलले आणि ते यशस्वी केले. त्यांनी ‘जाणता राजा' केवळ मराठी भाषकांपुरते मर्यादित न ठेवता, त्याचे हिंदीकरणही केले. केवळ भारतातच नाही, तर भारताच्या बाहेरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल श्रद्धा असणारा वर्ग आहे म्हणून भारताच्या बाहेरही काही प्रयोग जाणता राजाचे केले आहेत. ‘जाणता राजा'सारखे भव्य नाट्य त्यांनी उभे केले तरी त्याबाबत ते समाधानी नव्हते.
 
‘राजमान्य राजश्री' या त्यांच्या चरित्रात त्यांच्या सूनबाई-चित्रलेखा पुरंदरे यांनी बाबासाहेबांच्या मनातली भव्यतेची कल्पना मांडली आहे. बाबासाहेब म्हणतात- ‘‘जगात इतर ठिकाणी होणारे असे प्रयोग पाहिले, तर आपण केवळ भिकारी आहोत असे वाटते. रोमजवळ मी एक प्रयोग पाहिला. त्यात एका स्टेजवर ५०० कलाकार काम करीत होते. ३०० घोडे होते आणि १२४ फूट उंचीच्या प्रचंड इमारतीवर त्यांनी तो प्रयोग केला. त्यांच्या इतिहासातील प्रसंगावर तो आधारित होता. हा प्रयोग पाहिल्यावर ‘जाणता राजा'च्या ३५ फुटांच्या स्टेजचं मला काही वाटेनासं झालं. आपण हिमालय कधी पाहात नाही म्हणून पर्वतीचंच कौतुक करतो.'' शरीर थकले असतानाही ते भव्य-दिव्य स्वप्न बघत. त्यांचे एक स्वप्न त्यांनी बोलून दाखविले आहे. ‘‘माझी भविष्यात काही स्वप्नं आहेत. ती भव्य-दिव्य आणि अफाट आहेत असं म्हणावं लागेल. मला संपूर्ण शिवचरित्र वॅक्स, प्लॅस्टर ऑफ पॅरिस अशा वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपुढे ठेवायचं आहे. म्हणजे ‘डिस्नेलँड' सारखी ही ‘शिवसृष्टी' असणार आहे...'' नवीन पिढीने शिवाजींचा वसा चालू ठेवण्यासाठी पुण्याजवळ त्यांनी ‘शिवसृष्टी' उभारण्याची योजना आखली व तिचे कामही सुरू केले आहे. त्यांच्या पश्चातही हे कार्य सुरू राहील, याची खात्री आहे.
 
विचारांशी तडजोड नाही
बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये विचारांशी वा व्यवहाराशी कधीच तडजोड केली नाही. त्यांच्या शेवटच्या आजाराच्या कालखंडात, गेल्या वर्षी मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, त्या दिवशी वाढदिवस असल्यामुळे मंडळींची बरीच वर्दळ होती. त्यावेळी त्यांनी माझ्याजळ व्यथा बोलून दाखविली की, देशामध्ये जे काही प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता आहे; मग तो हिंदुत्वाचा विषय असेल, तो राष्ट्रीयत्वाचा विषय असेल, तो देशभक्तीचा विषय असेल, तो जनसामान्यांमधल्या नैतिक मूल्यांचा विषय असेल, त्यासाठी एकदा आपण वेळ काढून अवश्य या. त्यावर चर्चा करायची आहे. आज शक्य नाही. पण माझे दुर्दैव की, त्यांची जी शेवटची इच्छा होती ती पूर्ण होण्याआधीच त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि बाबासाहेबांचे जीवन याकडे बघितले तर असे लक्षात येते की, इतिहास काळामध्ये जे आवश्यक होते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि वर्तमान काळामध्ये जे आवश्यक होते ते बाबासाहेबांनी करण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने बाबासाहेबांचे अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व आहे.
 
बाबासाहेबांचे स्मरण करताना त्यांच्या अपेक्षा काय होत्या, असा विचार मनात येतो. माझ्या मते, सारा देश शिवाजीमय व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावरती या देशाने चालावे. यातच देशाचे उत्थान आहे. हाच त्यांचा भाव राहिला; हीच त्यांची अपेक्षा राहिली. यासाठीच त्यांनी धडपड केली. यासाठीच त्यांनी आपल्या वाणीचा उपयोग केला. यासाठीच आपल्या अभ्यासासाठी विषय निश्चित केले. हेच त्यांचे चिंतन राहिले. आणि हे चिंतन मांडत असताना अत्यंत शुद्ध अशा प्रकारचे त्यांचे जीवन ते नि:स्वार्थपणे जगले. आज ते आमच्यात नाहीत, परंतु त्यांचे जीवन कधीही विस्मरणात जाणार नाही, अशी मला खात्री आहे. आणि म्हणून त्यांचे स्मरण करीत राहावे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण सर्वांनी वाटचाल करावी. हे केवळ बाबासाहेबांसाठी नाही, तर देशाच्या सुरक्षिततेसाठी, देशाच्या उत्थानासाठी, हिंदुत्वाच्या जागरणासाठी व संरक्षणासाठी आवश्यक आहे आणि म्हणून तुम्ही-आम्ही बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहत असताना, हा भाव आपल्या अंत:करणामध्ये दृढपणे रुजविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मला वाटते.