‘काट्सा’तून भारताला सवलत देण्याबाबत निर्णय नाही

- बायडेन प्रशासनाची माहिती

    दिनांक :24-Nov-2021
|
वॉशिंग्टन,
रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा घेतल्याबद्दल भारताला ‘काट्सा’तून सवलत द्यायची अथवा नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी माहिती बायडेन प्रशासनाने दिली आहे. या कायद्यात देश-विशिष्ट सवलतीची तरतूद नाही आणि या विषयावर द्विपक्षीय चर्चा सुरू राहील, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
intre _1  H x W
 
रशियाकडून ट्रायम्फ एस-400 यंत्रणेचा पुरवठा भारताला सुरू झाल्यानंतर आणि रिपब्किन व डेमॉकटिक खासदारांनी ‘काट्सा’अंतर्गत भारतावर नियंत्रण लादू नये, अशी मागणी केल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने उपरोक्त व्यक्तव्य केले आहे. अमेरिकन काँग्रेसने 2017 मध्ये ‘काट्सा’ कायदा लागू केला. रशियन संरक्षण आणि गुप्तचर क्षेत्रातील व्यवहारात गुंतलेल्या कोणत्याही देशाविरुद्ध दंडात्मक कारवाईची तरतूद या कायद्यात आहे.
 
 
अमेरिका भारतासोबतच्या धोरणात्मक भागीदारीला महत्त्व देते, असे स्पष्ट करतानाच, या कायद्यात देश-विशिष्ट सवलतीची तरतूद नसल्याचे पत्रकारांना सांगताना परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते नेड प्राईज यांनी या मुद्यावर संभ्रम कायम ठेवला आहे. एस-400 च्या संभाव्य वितरणाबाबत तुम्हाला भारतालाच प्रश्न विचारावे लागतील, असे त्यांनी सांगितले.
 
 
रशियासोबत संरक्षण व्यवहार केल्यास ‘काट्सा’अंतर्गत निर्बंध लादले जाऊ शकतात, असे आम्ही अगोदरच केवळ भारताच्या संदर्भात नाही तर, आमच्या सर्वच भागीदारांना सांगितले आहे. तथापि, आम्ही भारतावर निर्बंध लादण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितले.