गौतम गंभीरला पाकिस्तानातून आला धमकीचा ई-मेल

    दिनांक :25-Nov-2021
|
नवी दिल्ली,
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीरला (Gautam Gambhir) ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आला होता. दरम्यान, गौतम गंभीरने आरोप केला होता की, त्याला 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण, ज्या सिस्टीमद्वारे हा ई-मेल पाठवला गेला, त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमधील असल्याचे आढळून आले आहे.
 
 
gambhir_1  H x
 
दिल्ली पोलिसांनी याबाबत गुगलकडून (Google) माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अॅड्रेसही सापडला आहे. विशेष म्हणजे, फक्त गौतम गंभीरच नाही तर इतरही अनेकांना दहशतवादी संघटना ISIS च्या नावाने धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त इतर अनेक यंत्रणा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
 
 
गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप गौतम गंभीरने केला होता. याबाबत डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले होते की, गौतम गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गौतम गंभीर यांनी मंगळवारी रात्रीच ही तक्रार दाखल केली आहे. इसिस काश्मीरने फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीर यांच्याकडून करण्यात आला आहे.