आजपासून भारत-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना

    दिनांक :25-Nov-2021
|
स्थळ : ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर
वेळ : सकाळी 9.00 वाजतापासून
थेट प्रसारण : स्टार स्पोर्टस्वर
कानपूर,
ग्रीन पार्क स्टेडियमवर गुरुवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे श्रेयस अय्यर कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. एकंदरीतच अस्तित्वाच्या संकटाशी झुंजणारा कर्णधार रहाणे जागतिक कसोटी अजिंक्यपद पटकावणार्‍या न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी एक उत्तम संघबांधणीच्या प्रयत्नात असेल.
 
sport _1  H x W
 
या सामन्यात रहाणे यशस्वी ठरला, तर त्याला कारकिर्दीत पुढे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते किंवा त्याची नेतृत्व करण्याची ही शेवटची वेळ असेल. तिकडे 100 कसोटी सामने खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या ईशांत शर्मा आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात अंतिम अकरामध्ये स्थान मिळविण्यास चुरस असेल. श्रेयस अय्यर पदार्पण करणार आहे, परंतु मी संयोजनाबाबत काहीही सांगू शकत नाही, असे कर्णधार रहाणेने सामन्यापूर्वी स्पष्ट केले.
 
 
रोहित शर्मा व लोकेश राहुल या सलामीच्या जोडीशिवाय भारतीय कसोटी संघ मिळणे ही खरोखर दुर्मिळ गोष्ट आहे. कर्णधार विराट कोहली व विजयी खेळी करणारा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतसुद्धा संघात नाही. परंतु यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सुरू होणार्‍या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यापूर्वी त्याची भारताच्या दुसर्‍या फळीचे सामर्थ्य तपासण्याची संधी मिळत आहे.
 
 
पहिल्या कसोटीसाठी भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत केवळ रहाणे, चेतेश्वर पुजारा व मयंक अग्रवाललाच 10 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. मयंक व शुभमन गिलने सलामीला उत्तम कामगिरी करणे अपेक्षित आहे. कोणत्याही खेळात संघाच्या कर्णधाराला संघात सुरक्षित स्थान मानले जाते, परंतु या भारतीय संघात कर्णधार चालू हंगामातील 11 कसोटी सामन्यांत 19 च्या सरासरीनंतर आपली कारकीर्द वाचवण्यासाठी फलंदाजी करेल. अपयशी ठरल्यास रहाणेचा पुढील मार्ग कठीण होऊ शकतो. द्रविडलाही पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेला जाणार्‍या भारतीय संघात त्याच्या समावेशासाठी समर्थन करणे कठीण जाईल.
 
 
त्याचप्रमाणे 100 पेक्षा अधिक सामने व 300 पेक्षा अधिक बळी टिपणारा ईशांत शर्मा हा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे, परंतु त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. सराव सत्रात तो चांगल्या लयीत दिसला नाही. जर सिराजला अंतिम अकरामधून वगळले गेले, तर संघ व्यवस्थापनाचा निर्णय चुकीचा नाही हे या दुबळ्या वेगवान गोलंदाजाला पुन्हा सिद्ध करावे लागेल.
 
 
विदर्भाचा उमेश यादव मात्र पहिल्या पसंतीचा वेगवान गोलंदाज आहे. सराव सत्रातून मिळालेल्या संकेतांनुसार फलंदाजांचा क्रम गिल, मयंक व त्यानंतर पुजारा व रहाणे असा दिसतो. पुढे श्रेयस असेल, तर सूर्यकुमार यादवला कसोटी पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. द्रविडच्या नजरेखाली जयंत यादवने सराव सत्रात चांगली फलंदाजी केली.
 
 
जगातील अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी रविचंद्रन अश्विन उत्सुक आहे. त्याची तंत्रशुद्ध फलंदाज केन विल्यम्सनविरुद्धची लढाई कसोटी क्रिकेटप्रेमींसाठी एक मेजवानी असेल, परंतु रॉस टेलर, टॉम लाथम, हेनरी निकोल्स सारख्या अनुभवी खेळाडूंना अश्विन व जडेजाविरुद्ध सावधगिरीने खेळावे लागणार आहे. तिसरा फिरकीपटू अक्षर पटेल असण्याची शक्यता आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत शानदार पदार्पण केले होते. जयंत यादवही चांगल्या लयीत दिसत आहे. न्यूझीलंडकडे टिम साऊदी व नील वॅगनर हे दोन वेगवान गोलंदाज असतील. डावखुरा फिरकी जोडी एजाज पटेल व मिचेल सॅण्टनर तसेच ऑफ-स्पिनर विल्यम सोमरविले आक्रमण पूर्ण करण्याची शक्यता आहे.