आज नौदलाला मिळणार ‘आयएनएस वेला’

    दिनांक :25-Nov-2021
|
मुंबई, 
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आयएनएस विशाखापट्टणम् ही विनाशिका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केल्यानंतर आता नौदलाला कलवरी श्रेणीची चौथी पाणबुडी आयएनएस वेला मिळणार असून,  गुरुवारी ही पाणबुडी नौदलात दाखल होणार आहे.
 
maha_1  H x W:
 
आयएनएस वेला मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तयार करण्यात आली आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, आयएनएस खांदेरी आणि आयएनएस करंज भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुड्यांच्या तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आल्या आहेत, ज्या जगातील सर्वोत्तम पाणबुड्यांपैकी एक मानल्या जातात.
 
 
आयएनएस वेला 75 मीटर लांब आणि 1,615 टन वजनाची आहे. यात 35 नौसैनिक आणि आठ अधिकारी बसू शकतात. ही पाणबुडी समुद्राखाली 37 किलोमीटर वेगाने धावू शकते. ही पाणबुडी समुद्राखालून एका फेरीत 1,020 किमी अंतर पार करू शकते आणि 50 दिवस समुद्रात राहू शकते.