अरे देवा...आर्क्टिक समुद्रातही 'ट्रॅफिक जाम'

- अडकले 24 जहाज

    दिनांक :25-Nov-2021
|
मॉस्को,
आपल्याला नेहमीच रस्त्यामध्ये ट्राफिक लागत असते. ते आपल्यासाठी काही वेगळे नाही. मात्र समुद्रामध्ये ट्राफिक जॅम झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही न? मग आज आम्ही अशीच एक थक्क करणारी घटना सांगणार आहोत. रशियन किनाऱ्याजवळील आर्क्टिक समुद्रात साचलेल्या बर्फामुळे जवळपास 24 जहाज अडकले आहेत. बर्फ साचल्याने उत्तर समुद्री मार्ग बंद झाला आहे. या जहाजांची सुटका करण्यासाठी रशियाला आता बर्फ फोडणाऱ्या जहाजाला पाठवावे लागले आहे. रशियाने उत्तर समु्द्र मार्ग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे. मात्र, बर्फ साचल्यामुळे रशियन अधिकाऱ्यांचा अंदाज चुकला आहे. हा समुद्र मार्ग संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर सुरू राहिल अशी घोषणा रशियन अधिकाऱ्यांनी केली होती. आता मात्र, 'नॉदर्न सी रुट'च्या संचालक ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून लापटेव्ह समुद्र आणि पूर्व सायबेरियन समुद्रात बर्फ जमू लागल्याने आश्चर्यचकीत आहेत.
 
 
jam _1  H x W:
 
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच समु्द्रात इतका बर्फ जमा झाला आहे. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. अडकलेल्या 24 जहाजांपैकी काही जहाजांची सुटका करण्यात आली आहे. आता, उर्वरित जहाजांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मालवाहू आणि दोन टँकरचाही समावेश आहे. उत्तर समुद्र मार्ग हा युरोप आणि रशियाला जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. या मार्गामुळे सागरी प्रवासाचा कालावधी कमी होतो. बर्फामुळे अडकलेल्या जहाजांची सुटका महिनाभर तरी होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियन अधिकाऱ्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. रशिया आण्विक ऊर्जेवर चालणारे दोन जहाज पाठवणार आहे. या जहाजाद्वारे 11 इंच बर्फ तोडला जाणार असून इतर जहाजांचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे. या भागात हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. चुकीच्या हवामान वृत्तामुळे जहाज बर्फामध्ये अडकले असल्याचे म्हटले जात आहे.