शक्ती मिल अत्याचार प्रकरण...आरोपींच्या फाशीचे जन्मठेपेत रूपांतर

    दिनांक :25-Nov-2021
|
मुंबई,
साल 2013 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवूरन टाकणाऱ्या शक्ती मिल सामुहिक बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) आज आपला अंतिम फैसला सुनावला. हायकोर्टानं या प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द केली आहे.  हायकोर्टाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं आहे. मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आव्हान कोर्टानं 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं. त्यानंतर ही शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे पार पडली. या खंडपीठानं सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी जाहीर केला. राज्य सरकारनं या खटल्यासाठी अॅड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालाचं वाचन केलं.

sy_1  H x W: 0
काय आहे प्रकरण?
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी संध्याकाळच्या वेळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तीन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.