तिवारींनी काँग्रेसला दिला चिंतनासाठी मुद्दा !

    दिनांक :25-Nov-2021
|
अग्रलेख
२६ फेब्रुवारी २०१९. समस्त भारतवासीयांच्या लक्षात राहील असा ऐतिहासिक दिवस. त्याला कारणही आहे. याच दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करीत दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले होते. अतिरेक्यांना आणि पाकिस्तानला एक कठोर संदेशही दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने आपली एफ-१६ विमाने पाठवून आगळीक करण्याचा प्रयत्न केला असता भारतीय वायुदलाच्या वीर जवानांनी पाकी विमानांचा पाठलाग करीत एक एफ-१६ विमान पाडले होते. त्यावेळी चुकून पाकिस्तानी हद्दीत गेलेल्या भारतीय ‘फायटर पायलट' अभिनंदन वर्धमान याला पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी ताब्यात घेतले होते. पण, भारताने प्रचंड दबाव वाढविला आणि अवघ्या ६० तासांत पाकने अभिनंदन वर्धमान यांना सुखरूप भारताच्या हवाली केले. केंद्रात असलेल्या मोदी सरकारच्या धाडसामुळेच हे शक्य झाले. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रातल्या मोदी सरकारने थेट पाकिस्तानातील बालाकोटवर हवाई हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता आणि सरकारच्या निर्णयानुसारच भारतीय सैन्याने हल्ला करीत अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते.
 
manish tiwari_1 &nbs
 
राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय घडू शकते, याची प्रचीती त्यावेळी देशाला आली होती. ज्या अभिनंदनला पाकने पकडले होते, त्याच अभिनंदनला परवा वीरचक्र देऊन गौरविण्यात आल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. नसता झाला तरच नवल! हे सगळे याठिकाणी आज पुन्हा लिहिण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. स्वाभाविकही आहे. पण, हे लिहिण्याचे कारण आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला आहे. मुंबईवर २६/११ ला हल्ला झाला, त्यावेळी केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआच्या सरकारने म्हणजे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने अशीच राजकीय इच्छाशक्ती दाखवली असती तर अतिरेक्यांचे प्रचंड खच्चीकरण झाले असते. पण, काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नव्हती, ही बाब मनीष तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकातून देशवासीयांपुढे आणली आहे. एकप्रकारे मनीष तिवारी यांनी स्वपक्षावरच पुस्तक बॉम्ब फेकत पक्षाला घायाळ केले आहे आणि त्याचवेळी वस्तुस्थिती देशवासीयांपुढे आणली आहे. जगजाहीरपणे अशी कबुली देणा-या मनीष तिवारी यांचे खरे तर अभिनंदन केले पाहिजे. काँग्रेस पक्षात राहून पक्षातले दोष सार्वजनिक करायला हिंमत लागते. कारण, गतकाळात पक्षातल्या ज्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते, त्या २३ नेत्यांचे काय हाल झालेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
 
 
काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीपासून हा पक्ष आहे. पण, जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा काँग्रेसच्या स्थापनेचे औचित्य संपले आहे आणि हा पक्ष विसर्जित करायला हवा, असे विचार महात्मा गांधी यांनी व्यक्त केले होते. तेव्हा तर महात्मा गांधी यांचे कुणी ऐकले नव्हते. आताही महात्मा गांधींच्या विचारांना काँग्रेस पक्षात फार महत्त्व आहे, असे अजिबात नाही. सेवाग्राममध्ये पक्षाच्या नेत्यांनी चिंतन बैठक घेतली म्हणजे गांधींचे विचार आत्मसात केले, असा त्याचा अर्थ होत नाही. असो. त्यावेळी काँग्रेस विसर्जित करण्याचे जे विचार महात्मा गांधी यांनी व्यक्त केले होते, ते आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. आपल्या कृतीने काँग्रेसचे कर्तेधर्तेच पक्ष विसर्जित करायला निघाले आहेत, हे वास्तव आहे. देशातल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची आज काय अवस्था झाली आहे, हे आपण जाणतोच. देशातल्या सर्व प्रमुख राज्यांमधून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे. पंजाब, छत्तीसगड, राजस्थानचा अपवाद सोडला तर कुठल्याही राज्यात काँग्रेस स्वबळावर सत्तेत नाही. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक यांसारख्या अनेक राज्यांत काँग्रेस कमजोर झाली आहे.
 
 
सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या या पक्षाला सक्षम नेतृत्वाअभावी राज्याराज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत युती करावी लागत आहे; प्रादेशिक पक्षाच्या अटी मान्य कराव्या लागत आहेत, अनेकदा निवडणुकीत काँग्रेस पक्ष चौथ्या-पाचव्या स्थानावर फेकला जात आहे. काँग्रेस पक्षाला घराणेशाहीचे ग्रहण लागले असतानाही पक्षात लोकशाही असल्याची हास्यास्पद भाषा केली जाते. या पक्षात जर लोकशाही असती तर आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लोकशाही मार्गाने निवडणूक होऊन नियमित अध्यक्ष निवडला गेला असता. पण, लोकशाही केवळ नावापुरतीच असलेल्या काँग्रेस पक्षात सक्षम नेत्यांची गळचेपी केली जाते. त्यांचा आवाज दाबला जातो, हे वास्तव आहे. खुलेआमपणे कुणी काही भावना व्यक्त केलीच तर त्याला बाजूला फेकले जाते. त्यामुळे लोकशाहीबाबत तर काँग्रेसने काहीही न बोललेलेच बरे! सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेस पक्षात पानही हलत नाही. प्रियांका वढेरा यांच्याकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी आहे.
 
 
पण, निवडणुकांशिवाय त्या कधीही सक्रिय झाल्याचे दिसले नाही. उत्तरप्रदेशात भाजपाचे सरकार आहे. या राज्यात एखाद्या मुस्लिम बांधवाच्या संदर्भात काही घटना घडली की लागलीच प्रियांका तिकडे धाव घेतात आणि भाजपाच्या सरकारला बदनाम करण्याचा आटापिटा करतात. एखाद्या दलित व्यक्तीच्या संदर्भात अनुचित घटना घडली की, त्याचे राजकारण करीत आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात. पण, देशाच्या अनेक भागांत जेव्हा बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या बाबतीत एखादी अनुचित घटना घडली तर या महोदया तिकडे फिरकत तर नाहीच; साधा निषेधाचा शब्दही काढत नाहीत. यांचा ‘अजेंडा फिक्स' आहे. जनमानस भाजपाविरुद्ध भडकविणे आणि आपली राजकीय पोळी शेकून घेणे. हे असेच चालू राहिले तर काँग्रेस कधीच कुठल्याच राज्यात सत्तेवर येणार नाही. कायम प्रादेशिक पक्षांच्या पदराआड राहून महाराष्ट्रात जशी सत्ता मिळवली आहे आणि अपमान पचवला जात आहे, तशीच किंवा त्यापेक्षाही वाईट स्थिती काँग्रेसची राहील.
 
 
हा देश हिंदूंचा आहे, हे वास्तव आहे. बहुसंख्य हिंदू आहेत, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे हिंदुहिताकडे दुर्लक्ष करून जर काँग्रेस आपले राजकारण करणार असेल तर काँग्रेसला कधीच अच्छे दिन येणार नाहीत. हिंदुत्वाकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला परवडणारे नाही, ही बाबही अप्रत्यक्षपणे अधोरेखित केलीच आहे. ही बाबही काँग्रेसच्या धुरिणांनी गांभीर्याने घ्यायला हवी. मनीष तिवारी यांनी पुस्तक बॉम्ब फेकला म्हणून त्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाऊ शकतो. पण, असा प्रयत्न काँग्रेससाठी आत्मघाती ठरू शकतो, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी जेव्हा मुंबईवर हल्ला केला होता, त्यावेळी काँग्रेसप्रणित संपुआ सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करायला हवी होती. कोणतीही कारवाई न करणे हे कमकुवतपणाचे लक्षण असल्याचे तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे.
 
 
मुंबईवर हल्ला करून पाकिस्तानने जे नुकसान केले त्याचा बदला तर घ्यायलाच हवा होता, जसा मोदी सरकारने पुलवामाच्या घटनेनंतर घेतला. पण, तिवारी म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेसप्रणित संपुआ सरकारचे नेतृत्व करणा-या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगांनी मोदींप्रमाणे धाडस दाखविले नाही. कदाचित, सोनिया आणि राहुल गांधींनी मनमोहनसिंगांना रोखले असेल त्यावेळी. मनमोहनसिंग हे जरी पंतप्रधान होते, तरी प्रत्यक्षात सर्व अधिकार कुणाकडे होते आणि मनमोहनसिंगांची स्थिती काय होती, हे देशाने अनुभवले आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हल्ला करण्याचा निर्णय घेतला नाही म्हणून मनमोहनसिंगांना दोष देताही येणार नाही. दोष हा गांधी घराण्याला आणि त्यांना सल्ला देणा-या मंडळींना द्यावा लागेल. अमेरिकेतील ट्विन टॉवरवर अल कायदाच्या अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर अमेरिकेने ज्याप्रमाणे तत्काळ कारवाई करत बदला घेतला होता, तशी कारवाई २६/११ नंतर भारतानेही करायला हवी होती, या तिवारी यांच्या मताशी कुणीही असहमत असण्याचे कारण नाही.
 
 
पण, स्थापनेपासूनच तुष्टीकरणाचे राजकारण करणा-या काँग्रेसमध्ये धाडसी कारवाई करण्याचे मानसिक बळच नव्हते, हे कटू सत्य आहे. तुष्टीकरणाचे राजकारण करून काँग्रेसने स्वत:चे नुकसान करवून घेतले आहे. ज्या मुस्लिमांचा काँग्रेसने सत्तेत येण्यासाठी वापर करून घेतला, तेच मुस्लिम काँग्रेसपासून दुरावले आहेत. जिथे काँग्रेसला पर्याय आहे, तिथे मुस्लिमांनी पर्याय स्वीकारला आहे. उत्तरप्रदेशात सपा-बसपा, ओडिशात नवीन पटनायक, बंगालमध्ये ममता, बिहारमध्ये राजद-जदयू असे पर्याय स्वीकारत मुस्लिमांनी काँग्रेसला दूर केले आहे. बहुसंख्य हिंदूंना दुखावल्याने ते नाराज आणि मुस्लिमांचा केवळ वापर केला म्हणून तेही नाराज, यामुळे काँग्रेस पक्ष आज रसातळाला गेला आहे. आता तिवारींची काय अवस्था होते, हे येणा-या काळात कळेलच!