वर्धेमध्ये ३६ तासांची संचारबंदी

    दिनांक :19-Feb-2021
|
- नागरिकांनी घरातच थांबा -जिल्हाधिकारी
- वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद
तभा वृत्तसेवा
वर्धा,
वर्धा शहर व ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने, रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आणि कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता वर्धा जिल्ह्यात 36 तास संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वर्ध्यात वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत. शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजतापर्यंत वर्ध्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेऊन अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. 
  
wardha _1  H x  
 
कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 व्या कलम 188 अनवये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
हे सुरू राहील
दूध विक्रीची दुकाने सकाळी 6 ते सकाळी 10, सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहतील. जीवनावश्यक वस्तुची वाहतूक करणारे ट्रक मोटार व रिक्षा वाहने, आपातकालीन परिस्थितीत व रुग्णांच्या सेवेसाठी ऑटो रिक्षाची सेवा व स्वत: चे खाजगी वाहनाची सेवा घेण्याची मुभा राहील. जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठी जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात वाहतुकीच्या सेवा, वर्धा शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची औषधी दुकाने, औषधालये, रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, औषधी व वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, तसेच अधिकृत खाजगी वैद्यकीय आस्थापना ज्या कोविड-19 च्या आवश्यकतेच्या सेवा तरतुदीसाठी आहेत, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी अंतर्गत विज सेवा, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण/नगर परिषद/पालीका अंतर्गत पाणी पुरवठा सेवा, गॅस सेवा, रोड दुरुस्ती, नाले सफाई सुरु राहतील.
 
काय बंद राहील
सर्व बाजारपेठ, मॉल्स, कॉम्प्लेक्स येथील सर्व दुकाने ( वेद्यकीय सेवा वगळता) बंद राहतील. सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरेंट संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतील. चहा,मिष्ठानन प्रतिष्ठान, पानटपरी व इतर वस्तु विक्री, जिवनावश्यक व बिगर विनावश्यक वस्तूची दुकाने सुध्दा बंद राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खाजगी बसेस, खाजगी वाहतूक, एस. टी. बसेसची सेवा तसेच नगरपालीका हद्दीतील व जिल्हयातील ऑटो रिक्षा ची सेवा नागरिकांसाठी बंद राहील. वर्धा शहर व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोल, डिझेल पंप निर्देशाप्रमाणे बंद राहतील.