चामोर्शी नगरपंचायतीचा भोंगळ कारभार

    दिनांक :19-Feb-2021
|
- एका वार्डातील मतदारांचे नाव दुसऱ्याच यादीत
गडचिरोली,
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान चामोर्शी नगरपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. चामोर्शी शहरातील अनेक वार्डातील मतदारांची नावे दुसऱ्याच वार्डातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने येथील मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार उजेडात आला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान चामोर्शी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या या चुकीमुळे अनेक मतदारांची तारांबळ उडाली असून आपला नाव यादीत शोधण्यासाठी मतदारांना धावपळ करावी लागली आहे त्यामुळे नागरिकांनी येथील मुख्यधिकाऱ्यांविषयी रोष व्यक्त केला आहे.
 
charmoshi_1  H
 
एखाद्या मतदारांचे नाव दुसऱ्या वार्डातील मतदार यादी समाविष्ट करायचे असल्यास मतदारांकडून रीतसर अर्ज करून घ्यायचा असतो. मात्र येथील मतदारांनी आपले मत इतरत्र हलवण्याबाबत कोणतीही मागणी केली नसताना किंवा अर्ज केला नसतानाही ग्रामपंचायतीच्या मुख्यधिकाऱ्यांनी आपल्याच मनमर्जीने अनेक मतदारांची नावे इतरत्र दुसऱ्या वार्डाच्या यादीत हलविले आहे. मात्र आता आपले नाव जुन्याच वार्डातील मतदार यादीत समाविष्ट करून द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मतदारांनी सादर केलेल्या शपथ पत्रातून दिला आहे.