नागरिकांनी काळजी घ्या, अन्यथा लॉकडाऊनची वेळ : खा. जाधव

    दिनांक :19-Feb-2021
|
बुलडाणा, 
कोरोना विषयक सर्वत्र दाखवल्या जाणार्‍या बेफिकिरीने बाधित रुग्णाचा आकडा दररोज वाढत आहे. चिंता वाढत असून काळजी घेणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यातही लॉकडाऊन ओढाउन घेण्याची वेळ आपल्या सर्वावर येऊ शकते. त्यासाठी कोरोना नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा असे कळकळीचे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
 

jadhav prtap_1   
 
जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी कोरोना च्या बाबतीत असलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. गेल्या तीन ते चार दिवसात झपाट्याने पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत आहे. 200 आणि त्यापेक्षा अधिक आकडा पॉझिटिव रुग्णांचा येत असून आजही तब्बल 271 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. काही रुग्णाचे मृत्यू देखील होत आहेत.
 
बुलढाणा जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती कठीण होत चालली आहे.शासनाने या ठिकाणी अधिक सजगपणे भूमिका घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही संचारबंदी आणि नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोनाला हरवन आणि त्यापासून दूर राहणं हे सर्वांचे सहकार्य शिवाय शक्य होणार नाही. याठिकाणी प्रत्येकाला स्वतःची काळजी स्वतःला आणि कुटुंबाची काळजी देखील घ्यायची आहे.
 
मधल्या काळात सर्व काही व्यवहार सुरु झाले. निर्बंध शिथिल केले गेले. त्यामुळे तरुण वर्ग सह सगळे घराबाहेर पडत आहेत. यात काम नसताना सुद्धा अनेक जण गर्दीत जातात. त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत. परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत.
 
सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमांमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवा. ताप व अन्य कोरोना सारखी लक्षण दिसत असली तर लगेच तपासणी करून घ्या. लॉकडाऊन ची वेळ ओढून घ्यायची नसेल तर नियम पाळा असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे