अंजनगावात सफाई कामगारांचे काम बंद

    दिनांक :19-Feb-2021
|
-शहरात अस्वच्छतेचा कहर
-कर्मचार्‍यांचे पगार रखडले
तभा वृत्तसेवा
दहीगाव रेचा, 
अंजनगाव व सुर्जी या जुळ्या शहरातील कंत्राटी पद्धतीने असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाने वारंवार अडचणीत येत असून मजुरांच्या पगाराच्या व ईपीएफच्या प्रश्नांमुळे अनेक वेळा शहर स्वच्छता बंद राहत असल्याचे प्रसंग घडत आहे. या महिन्यात सुद्धा पगार मिळाला नसल्याने मजुरांनी मंगळवार 16 फेब्रुवारीपासून काम बंद केल्याने शहरात ठीकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे.
 

ghaniche samrajy_1 & 
 
स्वच्छतेचा जागर करणार्‍या नगर पालिकेचा केविलवाणा प्रयत्न कागदोपत्री असल्याचे सिद्ध होत आहे. नगर पालिकेकडून सबंधित कंत्राटदाराला नोटीस दिल्याचे नप मुख्याधिकार्‍यांनी सांगितले, मात्र केव्हा कारवाई होईल, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गेल्या तीन वर्षापासून दिलेल्या कित्येक नोटीसचा फक्त दिखावा नगर परिषद करीत असून त्यावर कधीच कारवाई केल्याचे दिसत नाही.
 
डिझेल मिळणेही झाले बंद
कचरा गाड्यांना गावात फिरण्यासाठी लागणार्‍या डिझेलचे पैसे सुद्धा पंप धारकाला वेळेवर न मिळाल्याने त्याने उधारीत डिझेल देणे बंद केल्याची सुद्धा माहिती समजली आहे. यातही कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. नगर पालिकेच्या वतीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

 
दंडाची कारवाई केल्या जाईल
याबाबत बोलताना मुख्याधिकारी सुमेध अलोणे म्हणाले की, मजुरांना नियमित पगार देणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. पगार न मिळाल्याने मजुरांनी दोन दिवसापासून काम बंद केले, परंतु त्याने आजच पगार देणार असल्याचे सांगितले. तेव्हा सबंधित कंत्राटदाराला दोन दिवस काम केल्या न गेल्याने नोटीस दिल्या गेली असून त्याच्यावर दंडाची कारवाई केल्या जाईल,असे यांनी सांगितले.