गोंदिया-दुर्ग, गोंदिया-इतवारी पॅसेंजर सोमवारपासून धावणार

    दिनांक :19-Feb-2021
|
-तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत अकरा महिन्यापासून बंद असलेल्या गोंदिया ते दुर्ग व गोंदिया ते इतवारी मेमू पॅसेंजर रेल्वेगाड्या सोमवार, 22 फेब्रुवारीपासून नियमीत सुरु करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
 
 

train123_1  H x 
 
 
कोरोना संक्रमनामुळे 20 मार्चपासून देशभरात धावणार्‍या रेल्वेगाड्याही बंद करण्यात आल्या होत्या. मे महिन्यानंतर टाळेबंदीत टप्प्याटप्प्याने झालेल्या शिथिलते काही कोविद स्पेशल रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. यातंर्गत गोंदिया रेल्वेस्थानकावरुन चालणार्‍या महाराष्ट्र व विदर्भ एक्सप्रेस मागील महिन्यात सुरु करण्यात आल्या. त्यामुळे नागपूर व मध्यप्रदेशातील दुर्ग पर्यंत संबंध येणार्‍या नागरिकांकडून या मार्गादरम्यान रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी होत होती. ती आता पूर्णत्वास येत आहे. 22 फेब्रुवारीपासून गोंदिया ते इतवारी व गोंदिया ते दुर्ग मेमू रेल्वेगाड्या कोविद स्पेशल म्हणून धावणार आहे.
 
 
दुर्ग येथून सकाळी 7 वाजता निघणार असून गोंदिया येथे 9.35 वाजता पोहचेल. तर गोंदिया येथून सायंकाळी 5.40 वाजता निघणार असून रात्री 8.20 वाजता पोहचेल. तसेच गोंदिया येथून सकाळी 9.45 वाजता निघून इतवारी येथे दुपारी 12.30 वाजता पोहचेल व इतवारी येथून दुपारी 3 वाजता निघणार असून सायंकाळी 5.30 वाजता गोंदिया येथे पोहचेल. या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना व रेल्वे प्रशासनाला कोविद नियम पाळावे लागणार आहेत.
 
तिकीट दराबाबत संभ्रम...
22 फेब्रुवारीपासून सुरु होणार्‍या उपरोक्त रेल्वेगाड्यांचे तिकीट हे संबंधित रेल्वेस्थानकावरील तिकीट खिडकीवर उपलब्ध होणार असून तिकीटाचे दर हे एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचे आकारले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र तिकीट दराबाबत अद्यापही संभ्रम असून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.