संस्कृत भाषा विश्वव्यापी व्हावी - शांताक्का

    दिनांक :19-Feb-2021
|
- संस्कृत भारतीतर्फे वसंत पंचमी उत्सव
- वसंतराव देवपुजारी यांचा सत्कार
नागपूर, 
संस्कृत भारतीचे कार्य उत्तरोत्तर वाढावे आणि संस्कृत भाषा विश्वव्यापी व्हावी, असा मानस राष्ट्र सेविका समितीच्या संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केला.
संस्कृत भारती नागपूर महानगरच्या वतीने शुक्रवारी देवी अहल्या मंदिर, धंतोली येथे वसंत पंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून शांताक्का बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व सहकार भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव देवपुजारी, संस्कृत भारतीचे उपाध्यक्ष डॉ. श्रीनिवास वरखेडी, महामंत्री श्रीश देवपुजारी, विदर्भाचे अध्यक्ष रमेश मंत्री व महानगर अध्यक्ष डॉ. मोहन खेडकर उपस्थित होते.
शांताक्का पुढे म्हणाल्या, वसंत ऋतू ज्याप्रमाणे आनंद आणि समाधान देतो त्याचप्रमाणे वसंतराव देवपुजारी यांचे कुटुंब समाजाला आपल्या कार्यातून आनंद आणि समाधान देण्याचे कार्य करीत आहेत.
 
qq_1  H x W: 0
 
देवपुजारी हे कुटुंब कुठलीही अपेक्षा न करता तन, मन आणि धनाने कार्य करीत समाजाला प्रेरणा देण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घेत समाजातील लोकांनी आपले योगदान द्यावे, असेही आवाहन यावेळी शांताक्का यांनी केले.याप्रसंगी डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते वसंतराव देवपुजारी यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वसंतरावांनी संस्थेला दिलेल्या 10 लाख रुपयांच्या देणगीचे निमित्त साधून या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मुलींनी नृत्य, गीत आणि महिला पदाधिकार्‍यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. कार्यक्रमाला संस्कृत भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.