कोरोना नियमांसाठी प्रशासन रस्त्यावर

    दिनांक :20-Feb-2021
|
- नागरिकांची कर्मचार्‍यांसोबत हुज्जत
रिसोड,
वाशीम जिल्ह्यात कोरोणा संसर्गाचा झपाट्याने होत असलेला प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार रिसोड येथील महसूल, नगरपरिषद, पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरलेला आहे. मात्र, काही नागरिक कर्मचार्‍यासोबत हुज्जत घालत असल्याचे पहावयास मिळाले.
 
 
rule_1  H x W:
 
नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग नियमाच्या प्रति मानसिकता निर्माण होत नव्हती. नागरिक सर्रास नियमाचे उल्लंघन करत विना मास्क व सामाजिक अंतर नियमाचे उल्लंघन करीत होते. या अनुषंगाने जिल्ह्यात कलम 144 लागू करून जमाबंदीवर आळा घालण्याकरीता संबंधित प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले होते. 20 फेब्रुवारी रोजी तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी गणेश पांडे, ठाणेदार एस. एम. जाधव यांचा ताफा रस्त्यावर उतरला व विना मुखाच्छादन फिरणार्‍यावर कारवाईचा धडाका सुरू केला. कारवाईचा धडाका सुरू असताना याची चर्चा वार्‍यासारखी पसरली व नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मुखाच्छादन लावणे तसेच शहरात वावरत असताना सामाजिक अंतराचे पालन करण्यास सुरुवात केली. मात्र, यादरम्यान दंडात्मक कारवाई करत असताना कर्मचार्‍यांसोबत काही नागरिकांनी हुज्जत व वाद घातला असल्याचे कळाले. ही कारवाई सुरूच राहणार सोबतच कठोर सुद्धा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळाले.
 
 
 
सद्यस्थितीत लग्न सराइची धूम तालुक्यात दिसून येत आहे. मात्र 144 कलम लागू असल्याने लग्न कसे लावावे ही चिंता सतावत आहे. मंगल कार्यालय यांना प्रशासनाने नोटिसा बजावून कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करू असा इशाराही यापूर्वीच देण्यात आलेला आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. तर कारवाईचा बडगा टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन सुद्धा करण्यात आली आहे.
 
 
 
कोरोना संसर्गचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. नागरिकांनी आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या नियमाचे पालन करावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
अजित शेलार (तहसीलदार)
 

दंड वसूल करणे म्हणजेच कोरोना संसर्गाचा थांबेल असे नाही. या मागचा उद्देश कोरोना संसर्गाचा प्रसार रोखणे हा आहे.नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नियमाचे पालन जर केले तर कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मोलाचे ठरेल.
गणेश पांडे (मुख्याधिकारी रिसोड)