जनावरांची तस्करी करणार्‍यांना अटक

    दिनांक :20-Feb-2021
|
नागपूर, 
जनावरांच्या कत्तलीला राज्यात बंदी असतानाही जनावरांची वाहतूक करणार्‍या दोन आरोपींना परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्तांच्या पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून 10 जिवंत बैल हस्तगत केले.सुलतान अहमद निसार अहमद (27) इस्माईलपुरा कामठी आणि जावेदखान हाफिजखान (30) जुना भोईपुरा कामठी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 

janavar12_1  H  
 
 
 
 
एमएच 40 बीजी 9590 क्रमांकाच्या टाटा योद्धा मालवाहू पिकअप व्हॅनमधून जनावरांची तस्करी होत आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त निलोत्पल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकातील सहायक निरीक्षक विजय भिसे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये विजय भिसे, शिपाई सूरज भारती, दिनेश यादव, हरिश इंगळे, चेतन जाधव यांनी यशोधरानगर हद्दीत विटाभट्टी चौकात सापळा रचला. रात्री पावणेदहाच्या सुमारास नमूद क्रमांकाचे वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी वाहनचालकाला थांबण्याचा इशारा दिला.
 
 
 
परंतु, चालकाने पोलिसांकडे दुर्लक्ष करून आपले वाहन वेगात पळविले. पोलिसांनी पाठलाग करून यशोधरानगर पोलिस ठाण्यासमोर वाहनाला अडविले. पोलिस पथकाने वाहनाची तपासणी केली असता दहा बैलांना निर्दयतेने बांधून त्यांची वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी यशोधरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून 10 बैल आणि पिकअप व्हॅन असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.