वेकोलि प्रशासनाच्या विरोधात नागरिकांचा रास्ता रोको

    दिनांक :20-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
भद्रावती,
सततच्या स्फोटमुळे घरांना तडे गेले गेले असून, वेकोलि प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने व वसाहतीत वीज वितरण कंपनीतर्फे वीज जोडणी तोडल्यामुळे संतप्त झालेल्या माजरी येथील वेकोलि वसाहतीमधील नागरिकांनी गुरुवारी वेकोलि प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले.
 
 
vekoli_1  H x W
 
या आंदोलनाला युवा सेनेने सक्रिय पाठींबा देत रास्ता रोकोमध्ये सहभाग नोंदविल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात यावे यासाठी सामाजिक कल्याण तथा मानव संरक्षण संघाच्या माजरी शाखेतर्फे खासदार बाळू धानोरकर व संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. वेकोलिच्या माजरी खुल्या खाणीत करण्यात येत असलेल्या सततच्या स्फोटमुळे वसाहतीतील अनेक घरांना तडे जाऊन नागरिक असुरक्षित झाले आहे. याच क्षेत्रातील शाळेच्या ईमारतीवरही या स्फोटांचा परिणाम झाला असून, ईमारतीला भेगा पडल्यामुळे येथे शिकणार्‍या 400 विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे वेकोलि प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. त्याचप्रमाणे वसाहतीतील महाजन नगरातील घरांची वीज वितरण कंपनीकडून तोडण्यात आली आहे.
 
 
या वसाहतीत वीज गेल्या 15 दिवसांपासून बंद करण्यात आल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. या समस्या लवकरात लवकर निकालात न काढल्यास या विरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी दिला आहे. या आंदोलनात युवासेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, तालुका प्रमुख महेश जीवतोडे, माजरी शहर अध्यक्ष सरताज सिद्धीकी यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला तथा शेकडो नागरिक सहभागी झाले होते.