गुन्हा नोंदविणे, गुन्हेगाराला पकडने, गुन्ह्यासंबधी पुरावे गोळा करणे आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल करणे. ही किचकट प्रक्रिया असून पुरावे गोळा करण्यासाठी बराच कालावधी लागतो. आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने आरोपपत्र सबळ असावे. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडते. बरेचदा आरोपपत्र दाखल होण्यास विलंब होतो. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. न्यायालयानेही तत्परता दाखवीत पुराव्याच्या आधारे केवळ पाच दिवसांत शिक्षा सुनावली. असे क्वचित पाहावयास मिळते. ही घटना २०१८ मध्ये सीताबर्डी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. त्यावेळी तपास अधिकारी आणि पाठलाग करून आरोपीला अटक करणाèया कर्तव्यदक्ष पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
नरखेड निवासी लालचंद गजभिये याला दीक्षाभूमीला जायचे होते. तो रेल्वेने नागपूर रेल्वेस्थानकावर आला. दुपारची वेळ असल्याने तो पायीच दीक्षाभूमीला जाण्यासाठी निघाला. मध्य प्रदेश बसस्थानकाजवळ असताना आरोपी नीलेश पोटफोडे (३४) रा. अमरावती याने लालचंदजवळील पैसे हिसकण्याचा प्रयत्न केला. त्याने विरोध केला असता आरोपीने त्याला दगडाने रक्तबंबाळ केले आणि पैसे हिसकून पळाला. कर्तव्यावर असलेले पोलिस नायक पंकज रामटेके यांनी पाठलाग करून आरोपीला अटक केली. कर्तव्यदक्षतेमुळे सीताबर्डी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
शहराचे माहेरघर समजल्या जाणाèया सीताबर्डी पोलिस ठाण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांच्यावर आहे. प्रचंड अनुभव त्यांच्या सोबतीला आहे. विभागात त्यांनी यशस्वी जबाबदारी सांभाळली. आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळली. त्यांची कर्तव्यदक्षता आणि प्रचंड अनुभव लक्षात घेता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सबनीस यांच्यावर या पोलिस ठाण्याची धुरा सोपविली आहे. त्यांच्या सोबतीला एपीआय किशोर शेरकी, सुरेश धोटे, वसंता तायवाडे, रूपेश यादव, विजय मिश्रा, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत.
सीताबर्डीतील रविवारचा बाजार प्रसिद्ध आहे. व्यापारी वर्ग, प्रतिष्ठाने, बाजारपेठ, मॉल्स, उपाहारगृह, हॉटेल्स, मेट्रोस्थानक, राष्ट्रीय बँक आदी असल्याने याठिकाणी नेहमीच नागरिकांची गर्दी असते. या पोलिस ठाण्याची चार बीटमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मानस बीट, सिव्हिल लाईन, धरमपेठ आणि रामदासपेठ बीटचा समावेश आहे. ठाण्यात ११८ कर्मचारी आणि १६ अधिकारी आहेत. मोठी चार वाहने आणि आठ मोटारसायकल आहेत. दिवसा १० वाहनांवर तर रात्री मोठ्या वाहनांवर गस्त असते. पायदळही गस्तीवर कर्मचारी असतात.