संचारबंदीसाठी प्रशासन आणि तोडण्यासाठी नागरिक सज्ज

    दिनांक :20-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा,
पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यात कोरानााला सहा महिने प्रवेश मिळाला नव्हता. त्याहीनंतर जिल्ह्यातील आकडा फारसा वाढला नव्हता. परंतु, दुसर्‍या टप्प्यात वर्धा जिल्हा अचानक राज्यात दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला. आज शनिवार 20 रोजी रात्री 8 ते सोमवार 22 रोजी सकाळी 8 पर्यंत जिल्ह्यात कडेकोट संचारबंदी लागू करण्यात आली. त्याची अंबलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असताना वर्धेकर आज सायंकाळीही नियमांना तुडवताना दिसून आले.
 
 
cerfew_1  H x W
 
जिल्ह्यात कोरोनाचा पाहिजे तसा प्रादुर्भाव अद्यापही न जाणवल्याने नागरिक बिनधास्त आहे. प्रशासनानेही दिवाळीनंतर चांगलीच मोकळीक दिली होती. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातून कोरोनाची भीतीच नाहीशी झाली होती. आता अचानक चार दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून काल 108 तर आज शविवारी 56 कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अतिशय आक्रमकपणे उपाययोजनाकरून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसी बंद राहणार आहेत. त्याचे संपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच 5 पेक्षा जास्त नागरिक दिसता कामा नये, गर्दीच्या ठिकाणी मुखच्छादनाचा वापर करावा, असे आदेश दिले आहेत. मात्र, रविवारी संचारबंदी असल्याने आज शनिवारी नागरिकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केली होती. केसरीमल कन्या शाळेपुढे नव्याने तयार झालेल्या बाजारात सायंकाळी गर्दी मावत नव्हती. हा बाजार नगर पालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे, हे ×उल्लेखनिय. मात्र, सायंकाळी 7 वाजण्यापूर्वीच पोलिसांची वाहनं रस्त्यावरून फिरत असून दुकानं बंद करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याला दुकानदार प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले. उद्याच्या संचारबंदीसाठी जिल्ह्यात महसूल, ग्रामविकास, नगर पालिकांची चमूंसह असून 500 पोलिस आणि 35 अधिकारी 36 तासाच्या संचारबंदीवर डोळा ठेवून आहे.