अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्या !

    दिनांक :20-Feb-2021
|
- अ‍ॅड. कोठारी यांची मागणी
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
जिल्ह्यात गुरुवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वादळाने शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित नुकसानग्रस्त भागांचे सर्व्हेक्षण करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत तातडीने द्यावी अशी मागणी बाजार समितीचे सभापती व जिल्ह्याचे जेष्ठ सहकार नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केली आहे.
 
 
to_1  H x W: 0
 
मागील दोन दिवसांपासून सर्वदूर ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला व गुरुवारी अनेक भागात सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. जोरदार वादळाने शेतातील गहू, चना, ज्वारी, मका, कांदा, भाजीपाला, आदी पिके जमीनदोस्त झालेली आहेत. ओंब्यासह गहू मोडल्या गेलेला आहे. त्यामुळे भविष्यात उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतात कापणी करुन ठेवलेला गहू, चना, ओला झाल्याने तो काळा पडणार आहे. परिणामी, या मालाला योग्य भाव मिळणार नाही. चण्याचे व तुरीचे कुटार ओले झाल्याने जनावरांना खाण्यास योग्य नसल्याने पुढे जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने पाहणी करून शेतकर्‍यांना मदत करावी अशी विनंती वजा मागणी अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी शासनाकडे केली आहे.