कोरोना अपडेट- अमरावतीने शनिवारी नागपूरला टाकले मागे

    दिनांक :20-Feb-2021
|
कोरोनाचे 7 मृत्यू, 727 कोरोनाबाधित
 
तभा वृत्तसेवा
अमरावती, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची स्थिती भयंकर झाली आहे. दररोज नवे विक्रम होत आहे. शनिवारी तर कहरच झाला. एकाच दिवशी तब्बल 7 रुग्णांचा मृत्यू झाला तर 727 बाधित झाले. नागपुरपेक्षाही अमरावतीचे आकडे जास्त होते. नागपूरात शनिवारी 725 नव्या रूग्णांची नोंद तर एकूण 6 मृत्यू झाले.
 

corona_1  H x W 
 
जिल्ह्यात आतापर्यंत 28 हजार 815 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 4579 रुग्ण क्रियाशील असून त्यातील 2 रुग्णांना नागपुरात हलविण्यात आले तर 3616 गृह विलगीकरणात आहे. उर्वरित कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत 25 हजार 203 रुग्ण बरे झाले आहे. त्याचे प्रमाण घसरले असून 87.46 टक्क्यांवर आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी तब्बल सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात अमरावतीच्या अर्जुननगर येथील 66 वर्षीय पुरुष, छांगानीनगर येथील 79 वर्षीय पुरुष, अंबापेठ येथील 84 वर्षीय पुरुष, आंनद विहार कॉलनी येथील 33 वर्षीय पुरुष, दिप नगर येथील 68 वर्षीय महिलेचा, पंचवटी कॉलनी येथील 58 वर्षीय महिलेचा, तिवसा तालुक्यातल्या डोंगरयावली येथील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 
आतापर्यंत 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तो दर 1.60 टक्के आहे. नव्याने बाधित झालेल्या 727 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत 2 लाख 5 हजार 800 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 28 हजार 815 जणांचे अहवाल सकारात्मक आले आहे. गेल्या 23 दिवसात 7 हजार 132 व्यक्ती कोरोनामुळे बाधित झाल्या आहे.