कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण वाढवा : महापौर

    दिनांक :20-Feb-2021
|
- नगरसेवकांची मदत घेण्याचे निर्देश
- कोरोना नियंत्रण कक्षाला दिली भेट
- परिस्थिती आणि नियोजनाचा आढावा
नागपूर,
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. दररोज रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढविण्यासोबतच काही बाबींवर तातडीने अंमल करावा लागेल. या सर्व कार्यात संपूर्ण नगरसेवकांचा सहभाग घेतल्यास प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, अशा सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केल्या. कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपातील कोरोना नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि अधिकार्‍यांकडून उपाययोजना आणि नियोजनाबद्दलची माहिती जाणून घेतली. उपमहापौर मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यावेळी उपस्थित होते.

nagpur _1  H x  
 
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोव्हिड रुग्णांची संख्या शहरासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. लाकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरु झालेल्या ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत नागरिकांना नियमांचे पालन करीत दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा देण्यात आली. परंतु, शासन, प्रशासनाने वारंवार सांगूनही, वेळोवेळी इशारा देऊनही दिशानिर्देशांच्या पालनात कुचराई केली. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले. गेल्या काही दिवसात रुग्ण संख्येत झालेल्या वाढीने हे सिद्ध झाले आहे. मनपा प्रशासन अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत असले तरी दंड हा यावरील उपाय नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करायलाच हवे. आता मात्र कुठलीही हयगय न करता आक्रमकपणे कोरोना रुग्णांची ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत नगरसेवकांचा सहभाग घ्या, अशी सूचना महापौरांनी केली.
 
 
तत्पूर्वी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी महापौरांना कोरोना नियंत्रण कक्षामधून केल्या जाणार्‍या कामाची माहिती दिली. नियंत्रण कक्षामधून नागरिकांना खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या रिक्त खाटांची माहिती दिली जाते तसेच कोरोना लसीकरणासाठी ज्यांचे नाव आहे त्यांना दूरध्वनीद्वारे सूचना दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. कोरोना नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0712-2567021 असा असून यासंदर्भात विविध माध्यमातून प्रसिद्धी केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी उपस्थित होते.