मुखच्छादन न घालणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

    दिनांक :20-Feb-2021
|
बुलडाणा,
कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी मुखच्छादन, शारिरीक अंतर या नियमांचे पालन करावे. पालन न करणार्‍या नागरिकांवर नगर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाईचा धडाका लावण्यात आला. त्यानुसार नगर पालिकेने शहरातील मुख्य चौकात पाच पथकांची नेमणूक करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे.
 
 
kar_1  H x W: 0
 
जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांनी वाढत्या कोरोना प्रकोपावर आढावा बैठक घेतली. यानंतर शहरात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली. विविध उपाययोजना लागू करण्यात येऊन नव्याने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. बुलडाणा नगरपालिकेने 18 फेब्रुवारीपासून दंडात्मक कारवाईला सुरूवात केली. स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावर थांबून निरीक्षण करीत असल्याने कर्मचार्‍यांचा उत्साह दुणावला आहे. 19 फेबु्रवारीपासून 5 पथके तैनात करण्यात आली आहे. 5 पथकांना विविध परिसर ठरवून देण्यात आले आहे, पहिल्या पथकाकडे मलकापूर रोड, डॉल्फिन स्विमिंग पूल ते जयस्तंभ चौक, स्टेट बँक मुख्यालय. दुसर्‍या कडे जांभरून रोड, बसस्टँड परिसर ते संगम चौक, तिसर्‍या पथकाकडे चिखली रोड, बोथा खामगाव रोड , त्रीशरण चौक, चौथ्या पथकाकडे चिंचोले चौक, धाड रोड, नाका ते सर्क्युलर रोड आणि अतिक्रमण पथकाकडे जनता चौक, बाजारपेठ, मार्केट लाईन ते कारंजा चौक असा भाग देण्यात आला आहे. प्रशासक अधिकारी संजय जाधव व एकनाथ गोरे यांच्यावर समन्वयाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
 
 
या पथकांनी दंडाचा धडाका लावल्याने वाहनधारक ते पादचारी, दुकानदार निर्देशांचे पालन करीत असल्याचे दिसून येते. 17 फेब्रुवारी पर्यंत 10 टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे चित्र होते, मात्र परत कारवाईची धडक मोहीम सुरू झाल्याने मास्क घालणार्‍यांची संख्या 90 टक्के पर्यंत पोहोचली असल्याचे सुखद चित्र आहे, यामुळे कोरोना प्रतिबंधाला सहकार्य होत आहे.