शिवजयंती हा रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प दिवस- आ. सुधीर मुनगंटीवार

    दिनांक :20-Feb-2021
|
बल्लारपुरात भाजयुमोतर्फे शिवजयंती उत्सव उत्साहात
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम रयतेच्या कल्याणाचा विचार केला. रयतेच्या हृदयातील सिंहासनाला त्यांनी कायम महत्व दिले. छत्रपतींचे नाव उच्चारताच आपल्या शरीरात एक उत्साह संचारतो, आपल्याला मोठी ऊर्जा मिळते. शिवजयंती हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करण्याचा, त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस नसून, त्यांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
 
aasumu_1  H x W
 
शुक्रवार, 19 फेब्रुवारी रोजी बल्लारपूर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित उत्सवात ते बोलत होते. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बल्लारपूर शहरात आयोजित शिवजयंती उत्सवाला आ. मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हाध्यक्ष तसेच बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, अजय दुबे, राजू दारी, राजू गुंडेटी आदींची उपस्थिती होती.
 
 
 
आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, या जगात अनेक राजे झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेच्या मनातील ओळखणारा, त्यांचे सुखदुःख जाणणारा, त्यांच्या सुखदुःखात समरस होणारा जाणता राजा होते. जिजाऊ माँसाहेबांनी रामायण, महाभारतातील कथांच्या माध्यमातून पराक्रमाचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून केले. 15 व्या वर्षी मावळ्यांसह तोरणा जिंकत स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवराय म्हणजे अलौकीक पराक्रमाचे धनी होते. दुसर्‍यांच्या धर्माचा आदर, सन्मान करण्याची भावना, शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिली आहे. गनिमी कावा हा त्यांच्या युध्दतंत्राचा आत्मा होता. हे युध्दतंत्र जागतिक कुतुहलाचा व अभ्यासाचा विषय ठरले आहे. मराठ्यांच्या सर्व शत्रूंविरूध्द मराठ्यांनी या युध्दतंत्राचा वापर केलेला होता. मराठ्यांमध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण होत असताना गनिमी कावा युध्दतंत्राने त्यांना अनेक विजय मिळवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ रामदास स्वामींनी केलेले वर्णन त्यांच्या अलौकीक व्यक्तीमत्वाचे वर्णन आहे. ते खर्‍या अर्थाने नितीवंत, पुण्यवंत, जाणता राजा आहे, असेही ते म्हणाले.
 
 
 
यावेळी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवरायांच्या गौरवार्थ पोवाडा व सांस्कृतिक नृत्य असे कार्यक्रम यावेळी संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बल्लारपूर शहरातील 33 शाळा आणि महाविद्यालयातील सात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील विजेते डॉली निषाद, श्रेय बडकेलवार, रूतुजा कुडे, टिना परसुटकर, मोहिनी साळवे, साहील केशकर यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
संचालन भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व धर्मप्रकश दुबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशी सिंह, शिवचंद व्दीवेदी, निलेश खरबडे, कांता ढोके, रेणुका दुधे, वैशाली जोशी, रणंजय सिंह, मनीष पांडे, बुचय्या कंदीवार आदींनी परिश्रम घेतले.