आजीच नयनच्या अपहरणाची मुख्य सूत्रधार

    दिनांक :20-Feb-2021
|
- पैश्याच्या लालसेतून षडयंत्र
- सातपैकी सहा आरोपींना अटक
तभा वृत्तसेवा
अमरावती,
स्थानीक शारदानगर येथील चार वर्षीय नयन मुकेश लुणीया याच्या अपहरणाची मुख्य सूत्रधार आजीच असून पैशासाठी हिनाच्या मदतीने कुख्यात गुन्हेगारांना सुपारी देऊन हे षडयंत्र रचण्यात आले होते, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
kid_1  H x W: 0
 
पोलिसांनी या प्रकरणी सपना उर्फ हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे (वय 25 वर्ष), बंबईया उर्फ अल्मश ताहीर शेख (वय 18 वर्ष), फिरोज रशिद शेख (वय 25 वर्ष), असिफ युसुफ शेख (वय 24 वर्ष) चौघेही रा. कोठला अहमदनगर, मुसाहीब नासीर शेख (वय 21 वर्ष रा. मुंकुदनगर अहमदनगर), नयनची आजी व मुख्य सूत्रधार मोनिका उर्फ प्रिया उर्फ मुन्नी जसवतराय लुनीया (वय 47 वर्ष रा. शारदा नगर अमरावती), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आजीची मैत्रीण व लुणीया यांच्या घरी नेहमी येणे-जाणे असलेल्या हिनाच्या मदतीने ज्याला सुपारी देण्यात आली होती तो इसार शेख फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर आहे. 2005 ते 2018 या काळात त्याच्यावर खंडणी मागण्यासह अन्य असे एकूण 19 गुन्हे दाखल आहे. घटनेतील आजी वगळता अन्य सहा आरोपी नयनचे अपहरण करण्यासाठी घटनेच्या आठ दिवसापूर्वी पासून अमरावतीत मुक्कामी होते. घटना उघड झाल्यावर आजीची चौकशी पोलिसांनी केली. तसेच त्यांच्या मोबाईलवर त्याच काळात एकाच फोनही आला होता. हाच फोन पोलिसांसाठी मदतगार ठरला. त्याच आधाराने पुढे तपास सुरु झाला आणि प्रकरणाचा उलगडा होत गेला.
 
 
 
अपहरण यशस्वी व्हावे म्हणून नयनला ज्या बगिच्यात आजी रोज घेऊन जात होती, त्या बगिच्यात न नेता 17 फेब्रुवारीला दुसऱ्याच बगिच्यात घेऊन गेली होती. पैश्यांची लालसा पूर्ण करण्यासाठी हा डाव आखण्यात आला होता, हे देखील तपासात उघड झाले आहे. तपासत आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी विदर्भात कुश कटारिया व युग चांडक अपहरण प्रकरण घडले होते. त्यात दोघांचेही जीव गेले होते. त्यामुळे नयनला अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुखरूप सोडविणे, हे आमचे मुख्य ध्येय होते. त्यात आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी यशस्वी झाले याचा आनंद व अभिमान आहे, असे सांगून तपासात सहभागी असलेल्या सर्वांचे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी कौतुक केले. या कारवाईत उपायुक्त सातव, सहायक पोलिस आयुक्त डुबरे, पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे, कैलास पुंडकर, किशोर सूर्यवंशी, किशोर शेळके तसेच रवींद्र सहारे, प्रशाली काळे, योगेश इंगळे, क्रिष्णा मापारी, अशोक वाटाणे, राजेश पाटील, किशोर महाजन, अतुल संभे, विजय राऊत, दानिश शेख, राहुल ढेंगेकार, अमोल खंडेझोड, विनय मोहोड, निलेश गुल्हाने, छोटेलाल यादव, दिनेश भिसे, सागर सरदार, नरेश मोहरील, पवन घोम, संगीता फुसे, मीरा उईके यांनी सहभाग घेतला.
 
 
नयन आईच्या कुशीत
पोलिसांचे पथक शनिवारी सकाळी नयनला व आरोपींना घेऊन अमरावतीत पोहचले. त्याचे काकाही सोबत होते. त्यानंतर नयनला आईच्या ताब्यात देण्यात आले. आई दिसताच नयन बिलगला. आजोबांच्या कुशीतही तो गेला. वडील व भाऊ, बहिणींनाही खूप आनंद झाला. लुणीया कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.
 
 
प्रत्येकी 50 हजाराचा पुरस्कार
नयन अपहरण प्रकरणाचा यशस्वी तपास करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 हजाराचा पुरस्कार देण्याची घोषणा पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी केली. तसेच तपासात सहकार्य करणाऱ्या अहमदनगर येथील पोलिस पथकाला पुरस्कार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.