लग्नासाठी 50, तर अंत्यविधीसाठी 20 ची मर्यादा

    दिनांक :21-Feb-2021
|
- महेश भवनावर 5 हजाराचा दंड
- कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन गंभीर
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहावा, नियमांचे पालन करावे, मुखाच्छादनाचा वापर करा, यासह अन्य नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासन आता गंभीर कारवाई करीत आहेत. चंद्रपूर महानगरातील तुकूम प्रभागातील महेश भवनात नियमांचे उल्लंघन केले असता, भवन मालकास 5 हजार रूपयाचा दंड ठोठावला गेला. महानगरासह ग्रामीण भागातही ही कारवाई गंभीरतेने केली जात आहे.
 
chandrapur_1  H
 
दरम्यान, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांचेसह सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकार्‍यांवर विविध जबाबदार्‍या सोपवल्या आहेत. समर्पित कोवीड रुग्णालय, कोवीड दक्षता केंद्र इत्यादींची तपासणी करणे व यासाठी यापूर्वी वापर करण्यात आलेल्या इमारतींची तपासणी करुन त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहीत्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील, अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.
 
 
सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोवीड-19 बाधित किंवा संशयित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी गृह विलगीकरण अलगीकरणाची रितसर परवानगी घेऊन त्याबाबतच्या नियमांचे पालन करीत आहे किंवा नाही याची तपासणी करणे, नविन रुग्णांच्या संपर्कात असलेल्या कमीत कमी 20-30 व्यक्तीचा सुरुवातीच्या 48 तासांच्या आत शोध घेणे, त्यांना गृह विलगीकरण, अलगीकरण करणे, बाधित रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला, याबाबत त्या ठिकाणाचा कार्यक्रमांचा शोध घेणे व त्यांची कोरोना तपासणी करणे. एखाद्या परीसरात कोवीड-19 बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचा परिसरातील व्यक्तींच्या हालचालीवर निर्बंध लागू करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात यावेत. तसेच त्या क्षेत्रामधील सुचनांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशात नमूद केले आहे.
 
 
लग्न समारंभ व अत्यंविधी तसेच इतर मोठया प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करणे. लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती तसेच अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. सर्व हॉटेल, रेस्टारंट, डायनिंग हॉल, रिसोर्ट इत्यादी तत्सम ठिकाणाच्या आदरातिथ्य सेवा 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहतील, याची खातरजमा करणे. जिम, खेळाची मैदान, स्पोर्ट कॉम्प्लेक्स इत्यादी ठिकाणी कोरोना विषयक नियमावलीचे पालन व अंमलबजावणी करणे.
 
 
भाजीपाला मार्केट, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल या गर्दीच्या ठिकाणी सर्व दुकानदार, त्यांचे कर्मचारी, विक्रेते यांनी मास्क लावणे बंधनकारक असून, प्रवेश द्वाराजवळ विषाणूनाशक उपलब्ध ठेवणे. तसेच सदर ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी एका वेळी केवळ 5 ग्राहकच उपस्थित राहतील, असेही बंधन घातल्या गेले आहे. मास्कचा वापर न करणार्‍या व्यक्तींवर पोलिस विभागामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फिरत्या पथकामार्फत व इतर पथकांमार्फत शासनाच्या निर्देशाप्रमाणे दंड आकारणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा, व इतर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशित केले आहे.