आ. भांगडिया यांना राजस्थानमध्ये अटक व सुटका

    दिनांक :21-Feb-2021
|
- पोलिसांशी अरेरावी केल्याचा आरोप
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
प्रवेश बंदी असलेल्या रस्त्यावर वाहन चालविल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी वाहन चालकांवर दंड ठोठावला. दरम्यान, वाहनाखाली उतरून पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी चालकासह आ. बंटी भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया तसेच काही जणांना शांततेचा भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आणि काही तासात सुटका केली.
 
chandrapur _1  
 
चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया आपल्या कुटुंबियांसह राजस्थान पर्यटनवारीवर होते. दरम्यान, त्यांच्या बसचालकाने प्रवेश बंद असलेल्या रस्त्यावर चुकीच्या मार्गाने वाहन चालविले. तिथे पहारा देणार्‍या वाहतूक पोलिसांनी बस अडवली. वाहन चालकाकडील परवान्याची तपासणी केली आणि पाचशे रूपयाचा दंड ठोठावला. त्यावेळी आमदार बसखाली उतरले आणि याबाबतचा जाब पोलिसांना विचारला. राजस्थान पोलिसांच्या तक्रारीवरून भांगडिया कुटुंबियांना ताब्यात घेतले गेले आणि त्यांच्याविरूद्ध शांतत भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
पोलिसांनीच हुज्जत घातली: मितेश भांगडिया
 
त्या रस्त्यावर कुठेही प्रवेश बंदीचा फलक नाही. शिवाय वाहन अडवून वाहनाची तपासणी करणे, चालकांकडील परवाना जबरीने हिसकावणे हा पोलिसांचा प्रकार चुकीचा होता. आम्ही केवळ त्यांना माजी आमदार व विद्यमान आमदार असल्याचे सांगत होतो. पण, कर्तव्यावरील पोलिसांनीच आमच्याशी हुज्जत घातल्याची प्रतिक्रिया माजी विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी दिली आहे.