कोरोना वाढतोय, विनाकारण बाहेर पडू नका

    दिनांक :21-Feb-2021
|
-सुपर स्प्रेडरची तपासणी करणार
 
- जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन
 
 
नागपूर,
नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडूच नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सोबतच सोमवारपासून चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येत असून ’सुपर स्प्रेडर’ असणार्‍या घटकांना तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालय, अनिर्बंध वागणार्‍या नागरिकांवर आता सक्त कारवाई करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत.


nnn_1  H x W: 0
 
एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये सोमवारपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक वितरण व सेवेत सहभागी असणारे (सुपर स्प्रेडर) अर्थात अनेकांच्या संपर्कात येणारे भाजीवाले, दुधवाले, सलून, घरकाम करणार्‍या महिलांच्या चाचण्यांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांनी विना मास्क बाहेर पडू नये, विना मास्क बाहेर पडणार्‍यावर सक्त कारवाई करा, असेही स्पष्ट केले आहे.या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, डॉ. असीम इमानदार आदी उपस्थित होते.
 
 
बैठकीनंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हयातील नागरिकांसाठी व्हीडीओ संदेश जारी केला. त्यात नागपूर जिल्ह्यामध्ये 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान केसेस 639 बाधित पुढे आले. मागच्या केवळ पाच दिवसांमध्ये 331 बाधित पुढे आले. यामुळे आपल्याकडे हा संसर्ग पसरतो आहे. हे निश्चिकत आहे. संसर्गाला जर कमी करायचे असेल तर आम्हाला सगळ्यांना स्वयंशिस्त बाळगावी लागेल. कुठलाही लग्न समारंभामध्ये 50 वर व्यक्ती असतील तर त्या मंगल कार्यालयाच्या विरुद्ध कारवाई करणार आहोत. त्या सोबतच जे वधूपिता असतील त्यांना सुद्धा कारवाईला सामोरे जावे लागेल. या शिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार मध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोक आढळले तर हॉटेल्सवर कारवाई करू शासकीय आदेशाची अवहेलना वारंवार करणार्‍या मंगल कार्यालयाला, हॉटेल, रेस्टॉरंट, बारला काही दिवसांकरीता बंद ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.