-दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्याची होणार चौकशी -55 लाखाचे अफरातफर प्रकरण
हिवरखेड,
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायत मधील विविध प्रकरणातील एकूण 50 लक्ष रुपयाच्या अपहार प्रकरणी हिवरखेडच्या माजी सरपंच शिल्पा मिलींद भोपळे, ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांच्यावर आणि जवळपास 5 लक्ष रुपयाच्या LED लाईट प्रकरणात माजी सरपंच अरुणा सुरेश ओंकारे आणि गरकल यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हिवरखेड ग्रामपंचायत मधील लक्षावधी रुपयांची अफरातफर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू होते.
उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तेल्हाराचे गटविकास अधिकारी यांनी जि.प. विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांच्या नावे पत्र लिहून तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल या दोघांकडून फेर चौकशीत मूल्यांकनात वाढ करून तब्बल 50 लक्ष 43 हजार 511 एवढया रक्कमेचा अपहार चौकशीत सिद्ध झाल्याने या पन्नास लाखाच्या वसुलपात्र रकमेच्या वसुलीसाठी आरोपींवर फौजदारी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सोबतच तत्कालीन दुसऱ्या माजी सरपंच अरुणा सुरेश ओंकारे यांच्या कार्यकाळात एलईडी खरेदी प्रकरणात जवळपास 5 लक्ष रुपये अनियमितता झाली असल्याचे चौकशीत आढळले होते.विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल यांनी शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या सन 2016-17 आणि सन 2017-18 च्या मंजूर आराखड्यातील कामे आणि सन 2018-19 या आर्थिक वर्षात केली व सन 2016-2017-2018 च्या कामाकरिता एकूण रक्कम एक कोटी सदोतीस लक्ष वीस हजार सातशे त्रेचाळीस रुपये बँक खात्यातून काढले.
पण ग्रामपंचायत येथील मोजमाप पुस्तकामध्ये 82,62,914 रुपयांचे मूल्यांकन असून एकूण 50,43,511 रुपयांची तफावत आढळली आहे. ह्या रकमेचे प्रत्यक्ष काम झालेले नाही. त्यामुळे शासकीय निधीचा तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे व ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांनी संगणमताने त्याचा अपहार करुन शासनाची फसवणूक केली त्यांनी ही रक्कम स्वतःच्या फायदयाकरिता वापरली अशा आशयाच्या लेखी फिर्यादिनंतर हिवरखेड पोलिसांनी शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार धिरज चव्हाण आणि हिवरखेड पोलीस करीत आहेत.दोन माजी महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे हिवरखेडसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.