अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

    दिनांक :21-Feb-2021
|
बुलडाणा,
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सहा तालुक्यांत 17,557 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांमार्फत मदत व पुनर्वसन विभागास सादर केला आहे. या गारपिटीमुळे सहा तालुक्यांतील 114 गावांतील शेतीपिकांना फटका बसला आहे.दरम्यान पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

buldhana_1  H x 
 
जिल्ह्यात 17 फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. प्रारंभी बुलडाणा तालुक्यात सकाळी संततधार पाऊस पडून अंगावर वीज पडल्याने तांदुळवाडी येथील एका 60 वर्षीय वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू झाला होता. चिखली, देऊळगाव राजा, लोणार, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांसह सर्वच 13 ही तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. काही भागात अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ गारपीट झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सायंकाळी मेहकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांतही हा अवकाळी पाऊस बरसला होता. जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यांतील एकूण 114 गावांमध्ये शेतीपिकांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने प्राथमिक स्तरावर तयार केलेला हा अहवाल असून, त्यात 17,557 हेक्टरवर नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले आहे.