शेतकरी नेते सोडून वर्धेकरांचा बंदला 100 टक्के प्रतिसाद

    दिनांक :21-Feb-2021
|
- प्रशासनाशिवाय करून दाखवले
तभा वृत्तसेवा
वर्धा,
पहिल्या टप्प्यात सर्वात शेवट जिल्ह्याला गाठणार्‍या कोरोनाने दुसर्‍या टप्प्यात कहर केला. वाढलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या 36 तासांच्याटाळेबंदीला वर्धेकरांनी प्रशासनाशिवाय आज रविवार 21 रोजी 100 टक्के प्रतिसाद दिला. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीसाठी कालपासून प्रचंड उपाययोजना केली होती. परंतु, आज नागरिकांनी स्वत:च सय्यम दाखवल्याने प्रशासनावर तेवढा भार पडला नाही. मात्र, राज्य शासनाने संचारबंदीचा आदेश दिल्यानंतरही शेतकरी नेत्यांनी बजाज चौकात आंदोलन केल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.
 
wardha_1  H x W
 
जिल्ह्यात काल शनिवार 20 रोजी रात्री सुरू झालेली टाळेबंदी सोमवार 22 रोजी सकाळ 8 पर्यंत राहणार आहे. औषधी दुकाने, रुग्णालये वगळता सर्व सेवा बंद होत्या. आज सकाळी 6 ते 10 या वेळेत फक्त डेअरी सुरू होत्या. त्यामुळे काही लोक दूध, दही घेण्यासाठी बाहेर पडताना दिसले. त्यानंतर अतिशय महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिक भटकले नाहीत. काही उत्साही मात्र फिरताना आढळल्याने त्यांना पोलिसांनी समज दिली. शहर व तालुका स्थानावरील शहरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. वर्ध्यात उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, नपचे मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांच्यासह विविध पथक, पोलिसांची गस्त सुरूच होती. बजाज चौक, शिवाजी चौक, आर्वी नाका, धुनिवाले चौक, पावडे चौक आदी ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही होता. एसटी बस व अन्य खाजगी वाहतूक बंद होती. वर्धा नप क्षेत्रात मुखच्छादन न वापरता बाहेर फिरणार्‍या 30 व्यक्तींवर प्रत्येकी 200 रुपये आणि 5 आस्थापनावर भौतिक दुरतेचे पालन न करणे तसेच विषानुनाषकाची व्यवस्था न केल्याबाबत प्रत्येकी 1 हजार प्रमाणे 11 हजार रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पालिवाल यांनी दिली.
 
 
हिंगणघाटात संचारबंदीचा संमिश्र प्रभाव
 
हिंगणघाट : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातसुद्धा आज 21 रोजी संचारबंदीचा संमिश्र प्रभाव आढळला. शहरात तुरळक प्रमाणात रहदारी सुरु होती. रविवार मांसविक्रेत्यांचा महत्त्वाचा दिवस असल्याने काही मटनविक्री करणार्‍या विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरुच ठेवली होती. परंतु, पालिकेच्या कोरोना नियंत्रण पथकाला याची माहिती मिळताच दंडात्मक कारवाई करुन सदर दुकाने बंद करण्यात आली. हिंगणघाट शहरात सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे, सर्व फुटपाथ विक्रेत्यांनी या संचारबंदीला उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसुन आले. आज होणार्‍या पुर्वनियोजीत विवाह समारंभावर संचारबंदीमुळे ग्रहण लागले. मात्र अशातच शासनाकडून या विवाह समारंभावरती 20 लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पाडण्याची परवानगी दिल्याने वधुवराचे दोन्ही कुटुंबांनी शासनाचा आदेशाचे पालन करून कोरोना संबंधित खबरदारी घेत लग्नसमारोहाचे आयोजन केले. मंगल कार्यालयाचे प्रवेशद्वारावर मुखच्छादन, विषाणूनाशक देतच पाहुण्याचे स्वागत करताना दिसुन आले. यापुर्वी कडक संचारबंदीचे काळात जो अनुभव आला त्याप्रमाणे आजसुद्धा सर्व छोट्या व मोठ्या विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली. परंतु, शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे बिनबोभाट सुरूच होते.
 
 
दुचाकीवर फिरणार्‍यांना चोप
 
समुद्रपूर : कोरोनाच्या वाढत्या भीतीने संचारबंदीला समुद्रपूर तालुक्यात उत्तम प्रतिसाद. तालुक्यातील व्यापार्‍याने आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवून व तसेच नागरिकांनी सुद्धा घरी राहूनच उत्तम प्रतिसाद दिला आहे. पोलिस प्रशासनाने दुचाकीवर फिरणार्‍यावर चोप देऊन व काही जणांवर कारवाई करण्यात आली.
 
 
पंचक्रोशीत गाव खेड्यातील व्यापारी प्रतिष्ठान पुर्णपणे बंद
 
वडनेर : वडनेर तसेच पंचक्रोशीत गाव खेड्यातील व्यापारी प्रतिष्ठान पुर्णपणे बंद होते. संचार बंदीचे उल्लघंन होणार नाही याकरिता तहसीलकडून सुचना देण्यात येत होत्या. वडनेरचे ठाणेदार राजेंद्र शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी संचार बंदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली.
 
 
भोजाजी महाराज देवस्थान बंद
 
आजनसरा : येथील श्री संत भोजाजी महाराज देवस्थान परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. पुरण पोळी स्वयंपाक दोन दिवसापूर्वी पासूनच बंद करण्यात आले आहे. आज रविवार असल्याने भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची प्रचंड गर्दी असते. परंतु, आज संचारबंदी असल्याने संपूर्ण आजनसरा नगरी सह भोजाजी महाराज मंदिर परिसरासह गावात कडेकोट संचारबंदी ठेवन्यात आली. गावातील दुकानं, हॉटेल, चहा टपरी, पान ठेले काल रात्री आठ वाजता पासूनच पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.
 
 
देवळीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
 
देवळी : संचारबंदीच्या आदेशाला देवळीकरांनी काल 20 रोजीपासून उस्फुर्त प्रतिसाद दिला. देवळीकरांनी घरात राहून शासनाला सहकार्य केले. देवळी बाजारपेठ पुर्णपणे बंद होती. कृषीउत्पन्न बाजार समिती मध्ये शुकशुकाट असल्यामुळे लगतच्या गावातील शेतकरी देवळीत फिरकले नाही. पोलिस प्रशासनाची गस्त दिवसभर सुरू होती.
 
 
कारंजात संचारबंदीमुळे शुकशुकाट
 
कारंजा (घा.) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कारंजा तालुक्यातही सर्वत्र कडेकोट संचारबंदी आहे. कारंजा शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. दुकाने, हॉटेल, चहा टपरी, पान ठेले, रात्री आठ वाजता पासूनच पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या तुरळक बसेस फक्त महामार्गाने धावतांना दिसून आली. वर्धा जिल्ह्यातील बसवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. बसस्थानक बंदच असल्याने त्या परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ऐरवी सतत गजबजलेल्या महामार्गावरही तुरळक वाहतुकीमुळे निरव शांतता पसरली होती. शहरातील रस्तेही निर्मनुस्य दिसत होते. खाजगी दवाखाने व औषधी दुकाने मात्र सुरु होती.
 
लुटमार
 
शहरात काल रात्री 8 वाजतापासून संचारबंदीला प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनानच्या आवाहनाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसादही दिला. परंतु, बाहेर गावाहून अचानक आलेल्यांना लुटण्याचा कार्यक्रम काही ऑटो चालकांनी केला. बजाज चौकातून 19 किमी अंतर असलेल्या वायगावला जाण्यासाठी 300 रुपये तर रेल्वेस्थानकावरून बोरगाव (मेघे) येथे जाण्यासाठी 200 रुपये भाडे आकारण्यात येत होते. नाईलाजाने प्रवाशांना ते द्यावे लागले.