रामाळा तलाव रक्षणार्थ इको-प्रोचा सत्याग्रह लढा

    दिनांक :21-Feb-2021
|
- आजपासून बंडू धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव अतिक्रमणात गिळंकृत होत आहे. तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर झाली. मात्र, वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यासाठी सोमवार, 22 फेब्रुवारीपासून अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे.
 
chnadrapur_1  H
 
2008 मध्ये रामाळा तलावात आलेली इकोर्निया वनस्पती निर्मुलनाची मागणी व स्वच्छता अभियान राबविण्यापासून इको-प्रो सातत्याने पाठपुरावा करीत आहे. हा तलाव प्रदुषणमुक्त व्हावा, यासाठी मागील तीन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला गेला. पण, अद्याप प्रशासनाने लक्ष दिले नाही. मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या कार्यकाळात कामास प्रत्यक्ष सुरूवात करण्याचे ठरले. पण, कोरोनामुळे काम झाले नाही. वेकोलिमधून भुगर्भातील फेकले जाणारे पाणी शुद्धीकरण करून तलावात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या कामास वेकोलीकडून मंजुरी दिली गेली. हे काम पूर्णत्वास येत आहे. मात्र, अद्यापही तलावात येणारे मच्छीनाल्याचे सांडपाणी वळते करणे, नाल्यावर शुध्दीकरण संयत्र उभारणे, तलाव खोलीकरण या संदर्भात कुठलीच पावले प्रशासनाने उचलली नाही.
 
 
जलप्रदुषणामुळे जलजीव धोक्यात सापडले आहेत. दुषित पाण्यामुळे भूजल प्रदूषित झाले. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्यास तलावाचे खोलीकरण करणे. खोलीकरण करून तलावाचे सौंदर्यीकरण करावे, एक देउळ ते बगड खिडकी असा पर्यटनदुष्टया विकसित केलेल्या रस्त्याचे पूर्ण-बांधकाम करावे, यासह अन्य मागण्या जिल्हा व मनपा प्रशासनाकडे केल्या. याआधी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बैठा सत्याग्रह करण्यात आला. पण, प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आता सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.