मोर हवा तर...

    दिनांक :21-Feb-2021
|
- गिरीश प्रभुणे
दाट... घनदाट... घनगर्द... हिरवी काळीशार दाट झाडी. राई पलीकडच्या तीरावर... मध्ये संथ वाहणारी नदी... तिचा काळाशार डोह... शांत... ना तरंग... ना लाट... खोल खोल... तळ... नि...तळ...
लाल मऊशार मातीचं अंगण... त्या मातीवर बेभानपणे नाचणारी लच्छी... दूरच्या रानात उडत जाणारा मोर... त्याचा आभाळभर पसरलेला पिसारा... चमचमणारा पिसारा. त्याचेच उठलेले कातरवेळचे काळीज लकलक करणारे तरंग... मनाची उलाघाल करणारे तरंग... मनाच्या डोहावर उमटलेले... मोकळ्या वेळात मनात सतत या मोराचा संवाद चाले...
 
 
 
pic_1  H x W: 0
 
उंबराच्या पारावर कुणीतरी बसली होती पहाटेच्या अंधारात... हा उंबर... सदा बहरलेला... उंबराच्या सड्यात ती बसली होती... पाय आखडून पोटाशी धरून... अरे, ही रात्री उशिरा केव्हातरी आली असावी... अबोल कासाविशीने तिला हाताला धरून उठवलं... ‘‘ये... ये... अशी कशी आलीस...? एवढ्या रात्री...’’ तिच्या डोळ्यांना धार लागली होती...
काही दिवसांपूर्वी ती पळून गेली होती. यमगरवाडीचं मुक्त वातावरण सोडून ती मुक्त झाली होती. खूप शोध घेतला. तुकाराम मानेनं, मी... अनेक झोपड्या धुंडाळल्या. ती सापडली नाही. तिला आम्ही दिसत असू, त्यामुळे ती अदृश्य होई.
 
 
पहिल्यांदा आली होती. त्यावेळी केवढीशी होती! बाप जेलातून सुटून आल्यावर कसल्याशा भांडणात बापानं आईचं मुंडकं उडवलेलं. त्या मुंडक्याला घेऊन परत लावण्याचा प्रयत्न करताना रक्तात न्हाऊन निघालेली ती... आणि तिचा भाऊ... ‘‘मुलींना नको घेऊस यमगरवाडीत... अरे, खूप समस्या असतात...’’ दामुअण्णा दाते समजावत होते. इथंतर सार्‍या बायाच... द्रौपदीचं... सीतेचं नशीब घेऊन आलेल्या... आसर्‍याला टेकायला भूमी नसलेल्या... स्वत:च आभाळहीन भूमी बनून जगणार्‍या...
नुकत्याच आलेल्या गौरीनं तिला ताब्यात घेतलं. गौरी कानिटकर एका वेगळ्या विश्वातून आलेली. वृत्तपत्रातील नोकरी सोडून या निर्जन ‘समस्यांच्या बेटावर’ आलेली. ती सावली बनून मुलीला घेऊन गेली. मुन्नीचं आवरणं सुरू होतं. गौरी म्हणाली :
 
 
‘‘काका, आपण हिची तपासणी करून घेऊ. एक काळजी म्हणून. लगेचच.’’ धाराशीवला तिला घेऊन गेल्यावर डॉ. शहापूरकर म्हणाले, हिच्या सर्व तपासण्या घ्यायला हव्यात करून. पुढे पुण्यात सर्व तपासण्या करून घेतल्या. मुन्नी एचआयव्ही पॉझिटिव्ह निघाली. एक दाट काळोखी सार्‍या यमगरवाडी प्रकल्पावर पसरली. सोळा-सतराव्या वर्षीच एका जीवघेण्या आजाराची छाया तिच्यावर पडली होती. डॉ. जोशी-शरदराव एड्सवर प्रयोग करीत होते. कोहळ्याचा पेठा, काकडीतला ‘वाळूक’ म्हणून प्रकार, त्याच्या मुळ्यांची पावडर बनवून त्याचा वापर अन्नातून केला. अनेक औषधं सुचवली जात होती. तर एक दिवस मुन्नी परत निघून गेली. गौरी न् मी तुळजापूर धुंडाळलं. तुकाराम मानेनं अखेर शोधून काढलं. तुळजापुरात वडार वाड्याजवळच्या झोपडपट्टीत कुमार बरोबर-तिचा मानलेला नवरा- ती राहू लागली. त्याच्याकडूनच हा आजार तिच्यात संक्रमित झाला होता. त्याची बायको त्याला सोडून गेली होती. मुन्नीबरोबर तो राहू लागला. दोघेही माथ्यावर मृत्यूचा काटेरी मुकुट घालून उघडपणे संसार करू लागले. कुठली कुठली झाडापाल्याची औषधं घेत. एका वेगळ्या आनंदात ते जगू लागले. मृत्यूचं सावट... सावली त्यांनी आपल्या जगण्यानं पुरून टाकली... मुन्नीचा संसार सुरू झाला. तिला दोन मुली झाल्या. आम्हीच जास्त काळजीत. काळजीनं आम्हीच काळवंडलेलो. मुन्नी आनंदात जगू लागली. पुढे माझी वाट बदलली... मी परतलो. चिंचवडला गुरुकुल सुरू झालं. त्यात रमलो. गौरी यमगरवाडीतून मुक्त होऊन तिच्या संसारात रमून गेली.
 
 
एक दिवस मुन्नी आपल्या साताठ वर्षांच्या मुलीला घेऊन आली. डोळे खोल गेलेले. गाल आत गेलेले. पूर्ण रया गेलेली. चालताना अडखळू लागलेली. अंगातली शक्ती संपत चाललेली. डोळ्यांत सारखं पाणी. धार लागलेली...
‘‘काका... मला जगायचंय... माझ्या मुलींसाठी... मला मरायचं नाही... मला वाचवा...’’ तिच्या आर्त विनवणीनी सार्‍यांचे डोळे पाणावले... सर्व तपासण्या झाल्या. एड्सबरोबरच गर्भाशयाला कॅन्सर झालेला... पिशवी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. गुंतागुंत होती. एड्सनं ग्रासल्यामुळे हे ऑपरेशन खूपच धोक्याचं... जबाबदारीचं होतं. अखेर धोका पत्करणं हाच एकमेव मार्ग होता. या मार्गावरून जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. गुरुकुलम्मधल्या एका खोलीत तिची व्यवस्था केली. गुरुकुलम्च्या मुली तिला सर्वप्रकारे मदत करीत होत्या. आंघोळीला पाणी काढून देणं. औषधं वेळेवर घ्यायला लावणं. तिची मुलगी सहा-सात वर्षांचीच, पण आईची माय बनून तिला जपत होती. मुन्नीच्या डोळ्यांचं पाणी थांबत नव्हतं. शब्दाशब्दाला डोळे भरून येत. तिचे हाल, तिला होणार्‍या वेदना पाहवत नव्हत्या. तिची छोटी मुलगी न रडता, न थकता आईची सेवा करीत होती. ऑपरेशनचा दिनांक ठरला. लाखाच्यावर खर्च... गुरुकुलम्च्या गुजरबाई-शकुंतलाबाई, बन्सलताई... सार्‍या जणींनी सर्व प्रकारची मदत उभी केली होती. मुन्नी आमच्या घरातच वाढलेली. यमगरवाडीची पहिली मुलगी. सौ. संध्यानं तिच्यासाठी साडीचोळी घेतली. छानशी. ती तिला नेसवलीसुद्धा...
 
 
सकाळी उठलो, तर इतके दिवस न रडलेली तिची छोटी मुलगी रडत आली. मी धावत गेलो तर, रक्ताच्या थारोळ्यात मुन्नी पडली होती. पोटात वेदना होत होत्या... न्हाणीघरापर्यंत सर्वत्र रक्तच रक्त झालं होतं. काजल जाधव आणि इतर दोन मुलींनी मुन्नीला उचलून चटईवर ठेवलं. थोड्याच वेळात सर्व खोली स्वच्छ केली. डेटॉलने तिलापण पुसून घेतलं.
डॉक्टर वैद्यांशी बोलून दिला दवाखान्यात हलवायचं ठरलं. मुन्नीनं खूप विनवण्या केल्या. ‘‘मला आता दवाखान्यात नका ठेवू. तुमच्याजवळच माझा प्राण जाऊ द्या... माझ्या मुलीला सांभाळा...’’
 
 
माझ्या मनाचा भडका उडाला. रागात तिला खूप बोललो. तिला सांभाळण्यासाठी गेलेला वेळ... झालेला खर्च... सारं सारं माझ्या मुर्दाड मनानं तिच्या पुढं ओकलं...
‘‘का... का... पुढच्या जन्मी तुमची मनू बनून फेडीन सारे पांग...’’ तिच्या आर्त खोल आवाजानं माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं. मी काय बोलणार... मी बोलून तर गेलो होतो... किती अहंकार... या कामाचा... किती गंड आपल्या सेवेचा. जणू सारा गोवर्धन माझ्याच करंगळीवर मी तोलत होतो. क्षणभर का होईना मी अहंकारानं, द्वेषानं फुलून गेलो होतो आणि मुन्नी तडफडत होती. ‘अगं अगं... गौरी लक्षी कुठं कुठं नेशी... कुठं कुठं ठेवू...’ घरी आलेल्या गौराईला सारं फिरून दाखवतात तसं मुन्नीनं मला माझ्या मनातल्या सार्‍या कोपर्‍या-कोपर्‍यांतून फिरवून आणलं. सारा मनाचा आसमंत काळवंडून गेला होता. मुन्नी गौरी बनून सहस्र तेजानं तळपत होती.
 
 
तिला मुलींच्या गराड्यात सोडून मी खोलीत जाऊन बसलो. मुन्नीच्या त्या वाक्यानं मी अंतरबाह्य ढवळून निघालो होतो. मनूच्या पेक्षा ती खूपच लहान होती. पण संध्यानं मुन्नीचं सर्व मनस्विनीसारखंच सर्व केलं होतं.
मनाच्या आकांताला आवरून मी बाहेर आलो, तर मुली रडत म्हणाल्या, ‘‘मुन्नी निघून गेली... ’’ खूप प्रयत्न करूनही ती सापडली नाही. तिची ती सवयच होती. अंतर्धान होण्याची. तिला लपायला जागा लगेचच मिळे. एकच चांगलं होतं. रात्रीच मी तिला खर्चायला असूंदेत म्हणून पैसे दिले होते...
 
 
मुन्नीनं जाताना आपली रक्तचिन्हे रांगोळीसारखी सर्वत्र उमटवली होती. हृदयाचा थरकाप उडवणारा तिचा आजार.
दोन दिवसांनी परत तिचा दूरभाष आला. मुलगी बोलली. ‘‘आयला बार्शीच्या दवाखान्यात भरती केलंय...’’ नर्गीस दत्त इस्पितळात तिच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. अखेर सोलापूरला शासकीय रुग्णालयात दाखल केलं...
परमेश्वर काळेचा दूरभाष आला. ‘‘काका, मुन्नी गेली...’’ मी थिजून गेलो. पायातलं त्राणच गेलं. यमगरवाडीत आली त्यावेळी केवढीशी होती! आयुष्यभर तिच्या वाट्याला काय आलं? केवळ उपेक्षा... हाल... त्रास... अत्याचार... वेदना. सारं तिनं एकटीनं भोगलं. सर्व निर्णय एकटीनं घेतले. त्याच्या परिणामांना सामोरी गेली. ज्यावेळी तिला माझा आधार हवा होता, तो मी देऊ शकलो नाही... एक कायमचा सल ठेवून मुन्नी गेली. हे सर्व तिला का भोगावं लागलं... आणि तिनं ते आनंदानं स्वीकारलं. उंबराखाली तिनं रात्र काढली होती. काय मनात ठरवून आली होती ती...?
 
 
ज्यावेळी पहिल्यांदा आली होती, त्यावेळी ती मला, मोराची वाट पाहात, सतत न थकता, न दमता नाचणार्‍या लच्छीसारखी भासली होती. सावित्री-लच्छी आणि तिच्या मोरासंबंधी म्हणते :
‘‘मोर हवा तर आपणंच मोर व्हावं लागतं. पिसारा फुलवून एका पायावर उभं राहायचं, नाचायचं. तो पाय थकल्यावर दुसरा पाय टेकवायचा...’’
 
 
असं अवघडलेपणाचं, क्षणाक्षणाला अवस्था बदलणारं नृत्य तयार होतं. हे आयुष्यभराचं नाचणं.. लच्छीच्या वाटणीला आलं... सावित्रीच्या वाटणीला आलं... मुन्नीच्या वाटणीला आलं...! हा मोर असतो तरी कसा...? सारे भोग भोगायला लावून निघून जातो...
इथं तर मोराचा शोध घेता घेता मोरच बनलेली लच्छी... मुन्नीच मोर बनून निघून गेली. हा छळवादी मोर... अस्सा नाचवून का जातो...? मुन्नीचं आयुष्य तर हा मोर नासवूनच गेला...
 
- 9766325082