रातराण्यांनचे देवळी वळणमार्गावरूच पलायन!

    दिनांक :21-Feb-2021
|
- संतोष बियाला
देवळी,
परिसरातील नागरिकांना खडखड आवाजत करणार्‍यांचीच सवय आहे. ती फक्त आपल्याला आपल्या गंतव्यय ठिकाणी उशिरा का होईना पोहोचवून देते त्यावर ग्रामीण जनता समाधानी असते. तसा त्या राण्यांचा गावखेडे किंवा शहर वजा गावातील जनतेसोबत थेट संपर्क नसतो. परंतु, शहरातून येणार्‍यांना तिने त्यांच्याच ठिकाणी उतरवावे अशी अपेक्षा असते. परंतु, त्या रातराण्या वळणमार्गावरूनच पलायन करीत असल्याने रात्री येणार्‍या पाहुणे नाराजी व्यक्त केल्याशिवाय राहत नाहीत.
 
wardha_1  H x W
 
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील बसवाहक आणि चालक वरिष्ठ अधिकार्‍यांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्याचा आत्यंतिक त्रास रात्रीवेळी नागपूर आणि यवतमाळहून देवळीला येणार्‍या प्रवाशांना बसत आहे. देवळी हे नागपूर-यवतमाळ मार्गावरील एक महत्वाचे गाव असून व्यवसाय आणि शासकीय कार्यानिमित्त येथून असंख्य प्रवासी रोज नागपूर आणि यवतमाळला ये-जा करतात. काम आटोपल्यावर त्यांना परतीसाठी बस चालक आणि वाहकांच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागते. नियमाप्रमाणे नागपूरहून यवतमाळकडे जाणार्‍या व येणार्‍या प्रत्येक आगाराच्या गाड्यांना देवळी येथे थांबा असून प्रवाशांना बस-स्थानकाच्या आतमध्ये सुरक्षित उतरविणे आवश्यक आहे. परंतु, बसचालक आणि वाहक हे देवळीला उतरणार्‍या प्रवाशांना बस स्थानकापासून 2 किमी दूर असलेल्या वळणमार्गावर उतरवून देतात त्यामुळे रात्री प्रवाशांना भयंकर त्रास होतो. डिसेंबर 2019 मध्ये पूर्णत्वास आलेला बुटीबोरी- तुळजापूर चौपदरी महामार्ग हा देवळी शहराच्या 2 किमी बाहेरून सूनसान भागातून जातो याचेही भान हे कर्मचारी ठेवत नाही. अगोदरच कोरोना कारणामुळे अनेक बसफेर्‍या या रद्द झाल्यामुळे देवळीकरांसाठी नागपूर आणि यवतमाळवरून परतीचे पर्याय मर्यादित झालेत. त्यामध्ये मरपमं कर्मचार्‍यांचा हा उद्दामपणा प्रवाशांमध्ये चीड निर्माण करतो. प्रवासी हे महिला, वृद्ध किंवा दिव्यांग असेल आणि सोबत सामान तसेच लहान मुलं असल्यास होणारा त्रास हा भयंकर होतो.
 
 
बस-स्थानकात बसगाड्याचां प्रवेश हा नियमाप्रमाणे सक्तीचा असूनही जर कुणी वाहक-चालक त्याचे उल्लंघन करीत असेल तर देवळी बसस्थानकातील आवक-जावक हजेरी पुस्तकात नोंद न लावलेल्या गाड्याच्या चालक-वाहकांवर दंडात्मक कार्यवाही करावी, बस स्थानकामध्ये चोवीस तास वाहतूक नियंत्रक देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
 
 
देवळी हे गाव आंदोलनाबाबत संवेदनशील गाव आहे. येथे झालेले एसटीचे दोन आंदोलन संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.1980 मध्ये अभाविपने विद्यार्थी सवलतीपासमध्ये झालेल्या वाढीविरुद्ध आंदोलन केले. 1990 मध्ये झालेले एसटीसाठीचे आंदोलन अनेकांच्या स्मरणात आहे, याची मरापमंच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नोंद घेऊन वेळीच आवश्यक पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात पुलगाव आगार प्रमुख पांढरे आणि विभागीय वाहतूक अधिकारी धायडे यांच्यासोबत संपर्क केला असता देवळी स्थानकावर रात्री वाहतूक नियंत्रक नसल्याचाही फायदा बसवाहक आणि चालक उचलत असल्याने हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले असून वरिष्ठांना या संदर्भात माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले.