संघटनात्मकदृष्ट्या जिल्हा दीपस्तंभासारखा व्हावा

    दिनांक :21-Feb-2021
|
- आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
- चंद्रपूर जिल्हा भाजपाची बैठक
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
मातृभूमीचा उत्कर्ष हा एकच विचार भारतीय जनता पक्षाचा आहे. हा अनुशासनप्रिय असणार्‍या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ही सत्ताप्रिय नाही, तर सत्यप्रिय पार्टी आहे. जे यश आज पदरात पडले त्यासाठी अनेकांनी त्याग केला व बलिदान दिले. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम व सुक्ष्म नियोजन आवश्यक असते. आगामी काळात ते करावे. संघटनात्मकदृष्ट्या चंद्रपूर जिल्हा दीपस्तंभासारखा व्हावा, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
chnadrapur _1  
 
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे शनिवारी भाजपा (ग्रामीण) चंद्रपूर जिल्हा आढावा बैठकीचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा जेष्ठ नेते विजय राऊत, संजय देवतळे, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, प्रदेश कामगार मोर्चा सरचिटणीस अजय दुबे, भाजपा महामंत्री संजय गजपुरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे आदींची उपस्थिती होती.
 
 
आ. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याला पक्षाने भरभरून दिले. भाजपाच्या 65 संघटनात्मक जिल्ह्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यावर पक्षाचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे अनेक पद व मंत्रीपद आपल्याला मिळाली. भाजपाचा विचार घराघरात पोहोचावा म्हणून ही पदे मिळाली. हा आमचा नाही तर कार्यकर्त्यांचा गौरव होता. पक्षाच्या विचारांवर प्रेम असेल तर पक्ष मोठा होतो, असेही ते म्हणाले. हंसराज अहीर म्हणाले, भाजपा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बुथ रचना योग्य असली, तर निवडणूक जिंकण्यास मोलाची मदत होते. पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम करा. समाजमाध्यमांचा योग्य वापर करा, असे आवाहन केले. केंद्र शासनाला बदनाम करण्याचे षडयंत्र आज सुरू आहे. कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत, तरी हेतुपूरस्सर अपप्रचार केला जात आहे. त्याचा अभ्यास करून कार्यकर्त्यांनी बोलते झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
 
देवराव भोंगळे यांनी, भाजपाच्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेत अनेक सूचना केल्या. बूथ संपर्क अभियानाची सविस्तर माहिती दिली. नुकत्याच झालेल्या जिल्ह्यतील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.आगामी नगर परिषद-नगरपंचायत निवडणूक, जि. प., पं. स. पोटनिवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच कोरोनाकाळातील जनतेचे वीजबिल माफ करावे व अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी 24 फेब्रुवारीला होणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जेलभरो आंदोलनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच आनंद कोरे, अनिल डोंगरे, महेश बोरकर, हरिदास झाडे, उपसरपंच नामदेव लांजेवार, अशोक निब्रड यांचा आ. सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन संजय गजपुरे यांनी केले.