भारतीय कंपनी सचिव संस्थेचा व्यावसायिक न्यायालयाचा प्रस्ताव

    दिनांक :21-Feb-2021
|
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा
- विद्यार्थी होताहेत आत्मनिर्भर
 
 
नागपूर, 
अलिकडे न्यायालयावरील भार वाढत आहे. अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायालयावरील वाढता भार कमी करण्यासाठी व्यावसायिक न्यायालयाची संकल्पना भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी मांडली. या विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून त्यांना व्यावसायिक न्यायालयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. विशेष म्हणजे गडकरींनी याबाबत सकारात्मकता दर्शवल्याची माहिती भारतीय कंपनी सचिव संस्थेचे अध्यक्ष नागेंद्र राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
 

iii_1  H x W: 0 
 
 
भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या शिक्षण व प्रशिक्षणाविषयी सांगताना राव म्हणाले अलिकडे केंद्र सरकारकडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला चालना मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित आत्मनिर्भर होत आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासंबधी प्रकरणे हाताळण्यासाठी कमर्शिअल न्यायालयाची गरज आहे. न्यायालयाच्या पॅनलवर कंपनी सेक्रेटरींची नियुक्ती करता येईल. त्यांच्या माध्यमातून प्रकरणे हाताळणे सोयीचे होईल. या माध्यमातून भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
या संस्थेने आतापर्यंत देशभरातील 55 विद्यापीठांशी करार करून कंपनी सेक्रेटरीचे साहित्य त्यांच्या वाचनालयात उपलब्ध करून दिले. सोमवारी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी करार करण्यात येणार आहे. करारानुसार विद्यापीठाच्या वाचनालयात शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांना कंपनी सचिव संस्थेचे शिक्षण घेता येईल. देशभरात या संस्थेचे 65 हजार सदस्य तर साडेतीन लाख विद्यांर्थ्यांची नोंदणी आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी आधी 15 महिन्यांचे प्रशिक्षण होते. आता ते वाढवून 21 महिन्यांचे करण्यात आले आहे. याशिवाय संस्थेत 60 दिवसांचे प्रॅक्टीकल्सही देण्यात येतात. प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करता येते. हा कोर्स पूर्णतः व्यावसायिक असून, आत्मनिर्भर बनविण्यास मदत करतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कंपनी सचिव संस्थेची माहिती व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचेही राव म्हणाले. पत्रपरिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष देवेंद्र देशपांडे, तुषार पहाडे, सचिव रश्मी मिटकरी, खुशबू पसारी उपस्थित होत्या.
 
कोविड काळात सकारात्मकता
कोविड काळात सकारात्मकता कायम राहावी यासाठी संस्थेचे सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय लोकांच्या मुलाखती ऑनलाईन सादर करण्यात आल्या. या माध्यमातून प्रेरणादायी विचार पोहोचविण्यात आले.