जिल्ह्यात 12 कोविड केअर सेंटरला पुन्हा मान्यता

    दिनांक :21-Feb-2021
|
बुलडाणा,
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णसंख्या वाढत आहे. मध्यंतरी रुग्ण संख्या घटली होती. मात्र फेब्रुवारी मध्ये कोरोनाने डोकेवर काढले आहे. रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ आढळून येत आहे. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा प्रशासनाने नव्याने बारा केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शासकीय व खाजगी अशी 18 हॉस्पिटल सध्या कार्यरत असून 13 केअर सेंटर आहे. त्यात 12 ने वाढ झाल्याने ती 25 झाली आहे. तर 3 हजार पाच बेड आहे.
 
buldhana_1  H x
 
कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात 25 केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. मात्र डिसेंबर नंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. जसेजसे रुग्ण घटले तसे प्रशासनाने केअर सेंटरची संख्या देखील कमी केली होती. 25 वरून ही संख्या तेरावर आली होती. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला एक असे सेंटर तूर्त सुरू आहे. मात्र वाढती रुग्ण संख्या पाहता बारा सेंटर नव्याने सुरू होत आहे. जिल्हा मुख्यालयी असणार्‍या स्त्री रुग्णालयात देखील केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याचे अप्पर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर घोलप यांनी सांगितले. वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे हे आव्हानात्मक काम प्रशासनापुढे आहे. काल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांनी व्हीसी घेऊन अधिकार्‍यांशी संवाद साधला. या आठवड्यात तर हा आकडा कमालीचा वाढला आहे. डिसेंबरमध्ये रुग्ण संख्या कमी होत असल्याने व मृत्यूदर सुद्धा कमी असल्याने लोक मधल्या काळात निर्धास्त झाल्यासारखे वावरत होते. मास्क व सामाजिक दुरी पाळल्या गेली नाही परिणामी रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सध्या लग्न समारंभ सुरू आहे. या लग्न समारंभ कोणतीही मर्यादा पाळल्या गेली नाही. मोजक्या लोकांमध्ये लग्न लावण्याच्या सूचना असल्या तरी बंधने पाळली गेली नाही. परिणामी कोरोनाने डोके वर काढले. कोरोना बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून कोरोना योद्धे पुन्हा लढ्यास सज्ज झाले आहे.